
मुंबईत वाढलेले प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने कचरा जाळण्यास बंदी घातली असून 100 रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये गेल्या दहा दिवसांत आलेल्या 22 तक्रारीनुसार कारवाई करताना 2200 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांत हवेची गुणवत्ता कमालीची खाली आली असल्यामुळे पालिकेने कठोर नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये हवेत असलेल्या धुळीमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. बांधकामांच्या ठिकाणाहून उडणारी धूळ प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचे समोर आल्याने पालिकेने बांधकामांच्या ठिकाणी बंदिस्त करणे, पाण्याचा फवारा मारणे असे निर्देश दिले आहेत. याचबरोबर कचरा जाळल्यामुळे निर्माण होणाऱया विषारी धुरामुळे प्रदूषणाची घातकता वाढत असल्यामुळे कचरा जाळण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय शेकोटी पेटवण्यास बंदी घालण्यात आली असून 27 निर्बंध घालून देण्यात आले आहेत. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येत असून नियम मोडणाऱयांवर धडक कारवाईदेखील करण्यात येत आहे.
इथे करा तक्रार
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून 26 ऑक्टोबर रोजी प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार पालिकेच्या माध्यमातून मुंबईत कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी 24 विभागांत कारवाई करण्यासाठी एकूण 95 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामध्ये पालिका अधिकाऱयासह पोलीस, प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱयाचा समावेश आहे. यानुसार कचरा पेटवणाऱयांची तक्रार करण्यासाठी ‘मुखमंत्री स्वच्छ मुंबई 81696-81697’ हा व्हॉट्सअॅप नंबरही जाहीर करण्यात आला आहे. यावर छायाचित्रासह तक्रार करता येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त चंदा जाधव यांनी सांगितले.


























































