‘बेस्ट’ला 600 कोटी मिळण्याचा मार्ग मोकळा, पालिकेच्या महासभेची मंजुरी

34
best-2
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘बेस्ट’ उपक्रमाला पालिकेकडून सहाशे कोटी रुपये अनुदान मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला आज पालिकेच्या महासभेने मंजुरी दिली. मात्र या अनुदानासाठी पालिका प्रशासनाने घातलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात अशी मागणी शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी केली.

बेस्टला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पालिकेकडून 600 कोटी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत झाल्यानंतर पालिका प्रशासनाने सहाशे कोटी रुपये अनुदान देण्याचा प्रस्तावाला स्थायी समितीनेही मंजुरी दिली आहे. यानुसार शंभर कोटी रुपयांचे पहिले अनुदान मंजूरही करण्यात आले तर अटी व शर्थीचे पालन केल्यास उर्वरित अनुदान मिळेल असे पालिकेने स्पष्ट केले होते. याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पालिका महासभेपुढे सोमवारी मांडण्यात आला. सर्वपक्षीय सदस्यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले, परंतु अटी शिथिल कराव्यात अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, अनिल कोकीळ, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, सपाचे रईस शेख, भाजपचे प्रभाकर शिंदे आदींनी केली. दरम्यान, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करीत असताना बेस्टचे दायित्व पालिका घेणार आहे. त्यामुळे बेस्टचे महाव्यवस्थापक पद हवेच कशाला असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला.

पाच रुपये तिकीट योग्यच

बेस्टचे प्रवासी भाडे किमान पाच रुपये असावे अशी मागणी सर्वपक्षीयांनी अनेक वेळा केली परंतु याकडे काही लक्ष देण्यात आले नाही अशी नाराजी सर्वपक्षीय नगरसेवकांनी यावेळी व्यक्त केली. किमान भाडे आठ रुपयांवरून पाच रुपये करणे स्वागतार्ह आहे, मात्र तीन महिन्यांत बसगाड्यांचा ताफा सात हजारांपर्यंत वाढविणे अशा अटी लादणे योग्य नाही, असे नगरसेवकांनी सांगितले.

ऐतिहासिक दिवस -महापौर

आजचा दिवस महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असल्याचे सांगत सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी बेस्टला आर्थिक सहकार्य करण्याच्या तत्कालीन अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सहकार्य केल्याबद्दल महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी आभार व्यक्त केले.

महिलांसाठी फिडर बस सेवा असावी…

बेस्ट उपक्रमाने रेल्वे, मेट्रो, मोनो रेल्वेच्या दोन स्थानकांमधील अंतरापर्यंत पोहचण्यासाठी फिडर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे महिला प्रवाशांसाठीही स्पेशल फिडर बस सेवा सुरू करावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर व पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या