
सामना प्रतिनिधी, मुंबई
पालिकेच्या एफ दक्षिण विभागातील नायगाव-दादरमधील घनकचरा व्यवस्थापन खात्यामधील सफाई कामगारांना आता टॉवरमध्ये हक्काचा निवारा मिळणार आहे. पालिका ‘आश्रय’ योजनेंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करणार असून 23 मजली दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 928 घरे बांधण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 354 तर दुसऱ्या टप्प्यात 574 सदनिका बांधण्यात येणार आहेत. यासाठी पालिका 67 कोटी 29 लाख 15 हजारांचा खर्च करणार आहे.
दादर पूर्व येथील दादासाहेब फाळके मार्गावर घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांसाठी या वसाहती आहेत. या वसाहतींचा पुनर्विकास ‘आश्रय’ योजनेंतर्गत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यापैकी सध्या पहिल्या टप्प्याचे काम प्रस्तावित आहे. ज्यामध्ये दोन इमारती असून त्यामध्ये एकूण 354 सदनिका बांधण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 23 मजली दोन इमारती बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यातील तळमजल्यावर वाहनतळ आहे.
या इमारतीच्या पायाचे बांधकाम पायलिंग पद्धतीचे असून इमारत आरसीसी संरचनात्मक आणि सिमेंट विटांच्या भिंती आहेत. या पुनर्विकासामुळे नायगाव-दादर विभागात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्यामुळे सफाई कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे काम ‘मे नीव इफ्रास्ट्रक्चर प्रा. लि.’ या कंत्राटदाराला देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
दुरवस्था झालेल्या या वसाहतींच्या पुनर्विकासाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती, मात्र आता पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून सफाई कामगारांना पक्की घरे मिळतील. याच धर्तीवर पालिकेने ‘बीआयटी’ चाळींचा पुनर्विकासही करावा. ज्यातून पालिकेला आणखी घरे मिळतील.
-यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती
अशी होणार कामे
संरचनात्मक आरसीसी कामे करणे
एसीसी भिंतीचे बांधकाम करणे
विद्युत, लिफ्ट, अग्निशमन यंत्रणेचे काम करणे
पाइल व वाळवीनाशक कामे
अंतर्गत, बाह्य भागास सिमेंट गिलावा करणे
दरवाजे, खिडक्या, अंतर्गत-बाह्य नळकामे
पाण्याची टाकी, मलनिस्सारण, पर्जन्य, जलवाहिनीची कामे
summary- bmc cleaners get new homes in tower


























































