ताबडतोब हजर व्हा, नाहीतर कामावरून काढून टाकणार!दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांना आयुक्तांचा ‘डोस’

1321

पालिकेचे हजारो कर्मचारी ‘कोविड योद्धा’ बनून अहोरात्र कोरोनाविरोधात लढा देत असताना अनेक कर्मचारी वारंवार आवाहन करूनही जाणीवपूर्वक गैरहजर राहत आहेत. अशा कर्मचार्‍यांनी ताबडतोब आपल्या कर्तव्यावर हजर व्हावे अन्यथा कामावरून काढून टाकण्यात येईल अशा सज्जड इशारा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे. कामावर हजर न राहिल्यास साथरोग व आपत्ती नियंत्रण कायद्यानुसार बडतर्फीची कारवाई करण्यात येईल. यानंतर रिक्त होणार्‍या जागांवर तातडीने कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या प्रमुख चार रुग्णालयांसह सर्वोपचार रुग्णालयांसह 16 उपनगरीय रुग्णालये, प्रसूतीगृहे, दवाखाने आणि कोरोना हेल्थ सेंटरमध्ये आरोग्यसुविधा दिली जात आहे. असे असताना काही ठिकाणी वर्ग-3 आणि वर्ग-4 चे काही कर्मचारी वारंवार गैरहजर राहत आहेत. यामुळे पालिकेच्या उपलब्ध असणार्‍या कर्मचार्‍यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांनी कामावर हजर व्हावे यासाठी पालिकेच्या माध्यमातून देशहिताच्या आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून तरी कामावर हजर रहावे यासाठी वारंवार विनंती करण्यात येत आहे. तरीदेखील काही कर्मचारी अजूनही गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित पालिका अधिकार्‍यांची विशेष बैठक घेऊन वारंवार अनुपस्थित राहणार्‍या कर्मचार्‍यांना शेवटची संधी दिल्यानंतरही गैरहजर राहिल्यास बडतर्फ करावे असे निर्देश दिले. यावेळी महापालिकेच्या विशेष कार्याधिकारी मनीषा म्हैसकर, अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, सुरेश काकाणी यांच्यासह सर्व संबंधित ज्येष्ठ डॉक्टर, उपायुक्त, रुग्णालयांचे अधिष्ठाता आदी उपस्थित होते.

72 तासांच्या मुदतीची नोटीस
काही कर्मचारी गैरहजर राहत असल्यामुळे डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांवर कामाचा ताण येत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांना रुग्णालयांचे व्यवस्थापन करणेही दिवसेंदिवस कठीण होत आहे. कोरोनाचा प्रभाव पाहता हीच स्थिती राहिल्यास वैद्यकीय सेवांवर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. पालिका आयुक्तांनी गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांना शेवटची संधी दिली असून जे कर्मचारी गैरहजर असतील त्यांना 72 तासांत हजर होण्याची नोटीस द्यावी आणि तरीही गैरहजर राहिल्यास बडतर्फीची कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत.

आजारी, 55 वर्षांवरील कर्मचार्‍यांना ‘नॉन कोविड’ कामे
ज्या पालिका कर्मचार्‍यांचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांना काही आजार आहेत त्यांना ‘नॉन कोविड’ कामे दिली जाणार असल्याचे सदर नोटीसमध्ये नमूद करण्यात येणार आहे. दरम्यान, बडतर्फीमुळे रिक्त होणार्‍या आणि आधीपासून रिक्त असणार्‍या पदांवर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी संस्थांची नियुक्ती असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या