
मुंबईत समूह संसर्ग झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी रक्ताचे नमुने तपासून केले जाणारे सेरो सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेने चेंबूर, शीव-माटुंगा-वडाळा आणि दहिसर या भागांची निवड केली आहे. या भागांतील 12 वर्षांवरील रहिवाशांचे रक्ताचे नमुने घेतले जाणार असून निती आयोग, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंडल रीसर्च (टीआयएफआर) आणि इतर संस्था हे सर्वेक्षण करणार आहे.
देशात कोरोना रुग्णांचा आकडा 5 लाखांच्या पुढे गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर, देशभरात कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे की, नाही, हे याची खात्री करण्यासाठी रक्ताचे नमुने तपासणारे सेरो सर्वेक्षण करावे, अशा सूचना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)ने सर्व राज्यांना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील एम पश्चिम, एफ उत्तर, आर उत्तर या तीन प्रभागांची निवड करून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे का, संसर्गाचे सामाजिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने धोके कोणते आहेत, याबाबतचे हे मूलभूत स्वरूपाचे सर्वेक्षण असून या पुढेही अशा स्वरूपाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या आधी पहिल्या टप्प्यात मुंबईत 500 जणांचे सेरो सर्वेक्षण करण्यात आले आहे.
असे केले जाणार सर्वेक्षण!
तीन विभागांतील झोपडपट्टी परिसर वगळून इतर भागांतून 10 हजार रहिवाशांच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत.
आरोग्य अधिकारी आणि बिगर शासकीय संस्था यांचे पथक स्थानिक नगरसेवकांच्या साहाय्याने निवडक घरांना भेटी देऊन सर्वेक्षणात सहभागी होणाऱयांची नावे निश्चित करतील.
ही पथके रहिवाशांच्या घरी भेटी देऊन मूलभूत माहिती, संपर्कातील व्यक्तींचा इतिहास आणि इतर आजार यांची माहिती घेतील.
सर्वेक्षणात निवडक सोसायटया आणि त्यातील निवडक रहिवाशांची निवड केली जाईल. निवडलेल्या व्यक्तींच्या मर्जीने त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जातील.
मुंबईतील कस्तुरबा आणि फरिदाबाद येथील ट्रॉन्सलेशन स्वास्थ्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था यांच्या लॅबमध्ये रक्ताचे नमुने तपासले जातील. त्यात अँटीबॉडीज तपासल्या जातील.
अँटीबॉडीज तयार होणे हे कोरोना झाल्याचे लक्षण आहे.

























































