फुकटचा पगार घेताहेत, निवडणूक आयुक्तांना निलंबित करा! फडणवीसांची चोर कंपनी हरली आहे, उद्धव ठाकरे यांचा हल्ला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदाना वेळी बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या मुद्दय़ावरून तीव्र संताप व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची चोर कंपनी हरली आहे, हरलेल्या मानसिकतेतूनच त्यांना जिंकण्यासाठी असे गैरप्रकार करावे लागत आहेत, शाई नव्हे लोकशाही पुसली जातेय, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. इतका गोंधळ होतोय मग निवडणूक आयुक्त आणि त्यांचे कर्मचारी नेमका कशाचा पगार घेताहेत? जनतेचा फुकटचा पैसा खाऊन सत्ताधाऱयांची लाचारी करणाऱया निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून कारवाई करा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

मतदान केल्यावर मतदारांच्या बोटावर लावलेली शाई सहजगत्या पुसली जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर आज सकाळपासूनच व्हायरल झाले. अनेक प्रभागांमध्ये मतदार यादीमध्ये मतदारांची नावेच गायब होती. मतदान सुरू असतानाच निवडणूक अधिकाऱयांकडून टपाली मतदानाच्या पेट्या उघडण्याचा घाट घातला गेला होता. अशा अनेक तक्रारी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्या. शिवसेना भवन येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या या सर्व गोंधळावर सडकून टीका केली. लोकशाहीची हत्या चाललीय, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप निवडणूक जिंकण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहे. बोटावरील शाई पुसली जाण्याचा प्रकार यापूर्वी केव्हाच घडला नव्हता. गतवर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्या, पण मतदार याद्यांत कुठेही सुधारणा झालेली नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले.

…नाहीतर शिवसैनिकांना आयुक्तांच्या कार्यालयात बसवू

नऊ वर्षांनी मुंबईची निवडणूक होत आहे. या नऊ वर्षांत आयुक्त आणि त्यांचा कर्मचारीवर्ग काय करत होता? निवडणूक काळात आयोगाची दादागिरी चालते, मग निवडणूक नसते तेव्हा हे भाई लोक काय काम करतात, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. आता आयुक्तांना रोजच्या रोज त्यांनी काय काम केले हे त्यांच्या वेबसाईटवर सांगणे बंधनकारक केले पाहिजे, नाहीतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आयुक्तांच्या कार्यालयात बसवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

मतदानाच्या दिवशीच मतमोजणी, ही कसली लोकशाही?

उद्धव ठाकरे म्हणाले की, मतदानाचा व मतमोजणीचा दिवस वेगवेगळा असतो. पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात होत होती आणि मध्यरात्री किंवा दुसऱया दिवशी पहाटेपर्यंत निकाल लागायचे. मतदान पूर्ण होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत असा नियम आहे. त्यात पोस्टल मतदानही आले. पण आज प्रभाग क्रमांक 200 ते 206 च्या निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी मतदानाच्या दिवशीच टपाली मतदानाच्या पेट्या उघडण्याचे निर्देश दिले. ही कसली लोकशाही आहे, असा जाबही उद्धव ठाकरे यांनी विचारला.

किती दुबार मतदारांकडून हमीपत्रे घेतली?

शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दुबार मतदारांचे गठ्ठेंच्या गठ्ठे आयोगाला दिले. आयोग दुबार मतदारांकडून दुसऱयांदा मतदान करणार नाही याचे हमीपत्र घेणार होता. अशी किती हमीपत्रे त्यांनी आज भरून घेतली, असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

वनमंत्री गणेश नाईकांचे मतदान केंद्रच फरार

वनमंत्री गणेश नाईक यांना त्यांचे मतदान केंद्रच सापडले नसल्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी आयोगाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, नवी मुंबईत गणेश नाईकांना मतदान केंद्र चार तास सापडले नाही ही सध्याची स्थिती आहे. त्यांचे मतदान केंद्रच फरार झाले. टांगा आहे की नाही माहीत नाही. टांगा पलटी झाला नाही, पण नाईकांच्या टांगा मात्र दुखल्या आणि केंद्र फरार झाले, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

शिवसेना आणि मनसे सत्ताधाऱयांच्या खोटेपणाचे कुभांड फोडत आहे. मतांवर दरोडा घालण्याचा त्यांचा प्रयत्न लोकांपुढे उघडा पाडत आहोत. अन्यथा आम्ही एवढय़ा ताठ मानेने त्यांच्यापुढे उभे राहिलोच नसतो.

सॅनिटायझर आणि नेल पॉलिश रिमूव्हर लावून शाई पुसली जातेय. निवडणूक आयोगाने काय सॅनिटायझर आणि नेल पॉलिश रिमूव्हरची एजन्सी घेतलीय का? मतदारांच्या बोटावरची शाई सहज पुसली जातेय हे सत्य मुख्यमंत्री फडणवीस आणि निवडणूक आयोग नाकारत असेल तर नक्कीच त्यांची यात मिलीभगत आहे.

भाजप महायुतीने निवडणुकीत पैसे वाटले, चांदीची नाणी वाटली, वॉशिंग मशीन वाटल्या, असे पत्रकारांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, एवढा पैसा आला कुठून? वॉशिंग मशीन समजू शकतो, ते भाजपकडे आहेच. मिक्सर पण वाटलेत. सर्व भ्रष्टाचाऱयांना त्यात टाकून मिक्स करताहेत भाजपवाले. पण मिक्सर, वॉशिंग मशीन वाटली तरी जनता सूज्ञ आहे. ती तांदळातले खडे उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही.

पुरुषाच्या नावापुढे बाईचा फोटो, केंद्रात भाजप उमेदवारांच्या पाट्या

भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी घातलेल्या गोंधळाबाबत माहिती देताना काही मोबाईल क्लिप्सही उद्धव ठाकरे यांनी यावेळी माध्यमांना दाखवल्या. ते म्हणाले की, रवींद्र नामक व्यक्तीच्या नावापुढे बाईचा फोटो आढळला. ठाण्यात कुणाचे मतदान कुठे आहे हे कळायलाच मार्ग नाही. कल्याण-डोंबिवलीमध्ये मतदान केंद्राबाहेर भाजप उमेदवारांच्या नावाच्या पाट्या ठेवून मतदान केंद्राबाहेर केंद्र चालवले जात आहे. यावर आयोगाला काय म्हणायचे आहे? हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकाच वेळी सगळीकडे गोंधळ घालून सत्ता मिळवण्यासाठीच वन नेशन वन इलेक्शन हवे आहे. वाट्टेल ते करा, पण सत्ता काबीज करा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मोदींवरही निशाणा साधला.