
जोगेश्वरी विधानसभेत शिवसेनेची मशाल धगधगली. शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना त्यांच्या होमग्राऊंडवर चांगलाच धोबीपछाड मिळाला. जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात वायकर हे स्वतःच्या मुलीलाही निवडून आणू शकले नाहीत.
शिवसेनेचा गड असणाऱया जोगेश्वरीत विधानसभेत आमदार अनंत (बाळा) नर यांच्या नेतृत्वात शिवसेनेने आठ पैकी 4 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने आपले वर्चस्व राखले. मनसेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. शिवसेनेने प्रभाग 53 जितेंद्र वळवी, प्रभाग 73 लोणा रावत, प्रभाग 77 शिवानी परब, प्रभाग 79 मानसी जुवाटकर या मागच्यावेळी जिंकून आलेल्या जागा कायम राखल्या.
प्रभाग क्रमांक 74 मध्ये मनसेचे इंजिन धावले
प्रभाग क्रमांक 74 मधून मनसेच्या विद्या आर्या यांनी भाजपच्या उज्वला मोडक यांचा पराभव केला. सतत तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून येणाऱया मोडक यांना शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी शिवशक्तीच्या एकजुटीपुढे हार पत्करावी लागली.
भाजपने एक जागा गमावली
जोगेश्वरी विधानसभेत भाजपच्या मागच्यावेळी तीन जागा निवडून आल्या होत्या. यावेळी भाजपने एक जागा गमावली. प्रभाग 52 प्रिती सातम, प्रभाग 72 ममता यादव हे दोन उमेवार निवडून आले. तर प्रभाग 78 मध्ये शिंदे गटाच्या सोफी नाझीया विजयी झाल्या.
शिवसेनेचे विठ्ठल लोकरे सलग पाचव्यांदा विजयी
सत्तेसाठी पैशाचे अमाप वाटप, साम, दाम, दंड नीती वापरून जिंकणाऱया भाजप-शिंदे गटाचा शिवसेना उमेदवारांनी दारुण पराभव केला. गोवंडीच्या घाटला, खारदेव प्रभाग 153मधून मीनाक्षी पाटणकर तर प्रभाग 141मधून विठ्ठल लोकरे हे विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे विठ्ठल लोकरे हे पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले असून गोवंडीतील आपला गड अभेद्य ठेवला आहे.
गोवंडीच्या घाटला, खारदेव नगर येथून शिवसेनेच्या मीनाक्षी पाटणकर विजयी झाल्या. नागरिकांसाठी केलेल्या कामाचे चीज झाले. यापुढेही जनसेवा करत राहणार, लोकांच्या प्रश्नांना न्याय देणार असल्याचे पाटणकर म्हणाल्या.
































































