
पालिका निवडणुकीत समोर भाजप आहे, मिंधेंची टोळी आहे. समोर पैशाचे नाटक सुरू झाले आहे. ही लढाई मुंबईच्या अस्तित्वाची आणि भविष्याची आहे. या लढाईत विजय मिळवण्यासाठी आपली एकजूट महत्त्वाची आहे. मुंबई वाचविण्याच्या लढय़ात एकजुटीने लढूया, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
आदित्य ठाकरे यांच्या आज मुंबईत नायगाव-शिवडी-वडाळा तसेच कुलाबा येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी झंझावाती सभा झाल्या. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि मिंधेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. आदित्य ठाकरे यांनी अनेक मुद्दय़ांना हात घालत आपण मुंबईसाठी काय केले, याचा आढावा मांडला. ते म्हणाले, आपण स्वतः 4 वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये उभारली. आता भाजपला त्याच रुग्णालयांचे खासगीकरण करायचे आहे. बेस्ट बसेसचे भाडे भाजप तिप्पट केले आहे. 20 रुपयांमध्ये मुंबईत कुठेही जाऊ शकत, अशी सोय आपण केली होती. भाजपने ते वाढवले आहे. हे आपण घरोघरी जाऊन सांगायला हवे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
नागरिकांच्या समस्यांवरून भाजपवर कडाडून टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांनी सगळीकडे रस्ते खराब केले आहेत, फुटपाथ खोदून ठेवले आहेत, खड्डे करून ठेवले आहेत. त्यांना जातीपातीचे राजकारण करायचे आहे, पण मुद्दय़ाचे बोलत नाहीत. मी मुख्यमंत्र्यांना अनेकदा समोरासमोर चर्चेसाठी आव्हान दिले आहे. तुम्ही काय केले, ते सांगा. आम्ही काय केले ते सांगू. तुम्ही उत्तर देऊ शकाल का? असे सांगत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी पुन्हा खुले आव्हान दिले.
12 वर्षांमध्ये तुम्ही केले काय?
आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हणाले की, पंतप्रधान, मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री, गृहमंत्री भाजपचे आहेत. गेल्या 12 वर्षांपैकी जवळपास 10 वर्षे सरकार भाजपच्या हातात आहे. तुम्हाला महापालिकेच्या निवडणुकीत बांगलादेशी आठवले. 12 वर्षांमध्ये तुमची सत्ता असताना आज हिंदू खतरे मे हैं, असे तुम्ही म्हणता. मग 12 वर्षांमध्ये तुम्ही केले काय, असा कठोर सवाल आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.






























































