पालिका निकालावरून महायुतीत धुसफुस, शिंदे गटाच्या विरोधात भाजप पोलिसांत जाणार

मुंबई महापालिकेच्या निकालावरून भाजप आणि शिंदे गटात धुसफुस सुरू झाली आहे. भाजपच्या स्थानिक टोळीमुळे आपला पराभव झाला, असा आरोप समाधान सरवणकर यांनी केला आहे. दरम्यान, काही व्हॉटस्ऍप चॅटचे स्क्रीन शॉटही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. हा भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न असून, याबाबत शिंदे गटाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे भाजप दक्षिण मध्य मुंबई महासचिव अक्षता तेंडुलकर यांनी म्हटले आहे.

शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपच्या पदाधिकाऱयांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, उद्या सायबर क्राईमकडे शिंदे गटाच्या पदाधिकाऱयांविरोधात तक्रार नोंदविण्यात येणार आहे. भाजपाची बदनामी करण्यासाठी खोटे मेसेज ठरवून फ्रेम करण्यात आले आहेत. ही बदनामी कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली याची सखोल चौकशी व्हावी यासाठी तक्रार दाखल करण्यात येणार आहे. आता हे खोटे आरोप सहन केले जाणार नाहीत. सत्य लवकर समोर येईल, असे तेंडुलकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.