पालिका कर्मचाऱ्यांचा बोनस सोमवारी जाहीर होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत यशस्वी चर्चा

पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानुसार पालिका कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनसबाबत सोमवारी घोषणा केली जाणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून आरोग्य खात्यासह सर्व विभागाचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोना आता आटोक्यात येत आहे. तेव्हा कर्मचाऱ्यांना हक्काचे सानुग्रह अनुदान मिळालेच पाहिजे अशी भूमिका कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. पालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील सकारात्मक असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. हा बोनस किती असेल याबाबत सोमवारी रक्कम जाहीर केली जाईल असेही त्या म्हणाल्या. यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम, निमंत्रक अॅड. प्रकाश देवदास, वामन कविस्कर, अशोक जाधव, सत्यवान जावकर, सुभाष पवार, दिवाकर दळवी, के. पी. सिंग, के. पी. नाईक यांच्यासह कर्मचारी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या