
मुंबईतील पाळीव प्राण्यांसाठी खासगी स्मशानभूमी आहेत. मात्र पाळीव प्राण्यांसाठी पालिकेची स्मशानभूमी असावी म्हणून दहिसर येथे पहिली स्मशानभूमी उभारली जात आहे. या स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाहिनी असणार आहे. मुंबईत प्राण्यांसाठी ही पालिकेची पहिलीच स्मशानभूमी असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून प्रदूषणमुक्त स्मशानभूमी बनवण्यावर भर दिला जात असून दहिसर येथील कांदरपाडा येथे होणाऱ्या स्मशानभूमीसाठी 10 लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. पाळीव प्राण्यांसाठी पालिकेची स्मशानभूमी असावी यासाठी दहिसर येथील शिवसेनेच्या नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच दहिसर येथे पाळीव प्राण्यांसाठी पहिली स्मशानभूमी उभी राहत असून त्याचे सादरीकरण नुकतेच महापौर निवासस्थानी करण्यात आले. त्यावेळी महापौर बोलत होत्या. मुंबईत पाळीव आणि भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या मृत्यूनंतर विल्हेवाटीची समस्याही निर्माण होत आहे. यासाठी प्रत्येक विभागात अशा स्मशानभूमी बांधाव्यात, अशी मागणी तेजस्विनी घोसाळकर यांनी महापौरांकडे केली.
प्रदूषणमुक्त, इलेक्ट्रिक दहनवाहिनी
सर्वच राजकीय पक्ष मतदारांसाठी काम करतात. मात्र आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी मुक्या प्राण्यांवरही प्रेम करण्याचे शिकवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अभिषेक आणि त्यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी पाठपुरावा केल्यावर दहिसर स्मशानभूमीत पाळीव प्राण्यांसाठी पहिली प्रदूषणमुक्त, इलेक्ट्रिक स्मशानभूमी उभी राहत आहे. त्यासाठी 25 लाख रुपये निधीची तरतूद केली असून ही स्मशानभूमी पूर्णतः इलेक्ट्रिक असून त्यापासून प्रदूषण होणार नाही, अशी माहिती महापौरांनी दिली.
n पश्चिम उपनगरात पाळीव प्राण्याचा मृत्यू झाल्यास खादी ग्रामोद्योग या संस्थेकडून त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातात. मात्र पालिकेची स्मशानभूमी नव्हती, मात्र आता पालिकेकडून पहिली स्मशानभूमी उभारली जात आहे. तसेच येत्या आर्थिक वर्षापासून पालिकेच्या सात परिमंडळ विभागांत सात स्मशानभूमी पालिका प्राण्यांसाठी उभारणार आहे, अशी माहिती महापौरांनी दिली.



























































