पालिका रुग्णालयांत आणखी 300 आयसीयू-व्हेंटिलेटर बेड

425

पालिकेच्या विविध रुग्णालयांत आणखी 300 व्हेंटिलेटर-आयसीयू उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळे रुग्ण अत्यवस्थ झाल्यास त्याला तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. सध्या पालिकेकडे 620 व्हेंटिलेटर-आयसीयू आणि 1510 आयसीयू बेड असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पालिकेच्या रुग्णालयात कोविड रुग्णांना आवश्यक सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले. यामुळे 3 जुलैपर्यंत एकूण 80 हजार 600 रुग्णांपैकी 50 हजार 694 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्के आहे. याबाबतची सर्व माहिती पालिकेने सुरू केलेल्या डॅशबोर्डवर दर्शवण्यात आल्याचेही ते म्हणाले. मुंबईत 1 जुलैपर्यंत 3 लाख 39 हजार 796 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. पालिकेने कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 41 दिवसांकर पोहोचला आहे.

कोळे कल्याण कोविड सेंटरमध्ये एक हजार जणांवर यशस्वी उपचार
कोरोनाची बाधा झालेल्या पोलिस आणि त्याच्या कुटुंबीयावर सांताक्रुझ येथील कोळे कल्याण कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. या केंद्रात आतापर्यंत 1 हजार जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मुंबई पोलीस रस्त्यावर आहेत. कर्तक्यावर असताना कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांना उपचार वेळेत मिळावे यासाठी मुंबई पोलीस आयुक्त परमकीर सिंग यांनी पुढाकार घेत सांताक्रूझ आणि मरोळ येथे कोविड सेंटर सुरू केले. मे महिन्यात हे सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांची फौज तैनात आहे.

आणखी एक पोलीस अधिकाऱयाचा कोरोनाने मृत्यू
समतानगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाचा आज कोरोनाने मृत्यू झाला. त्यांच्यावर कांदिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या मृत्यूने मुंबई पोलीस दलातील कोरोनाने मृत्यू झालेल्याचा आकडा 39 झाला आहे. कांदिवली येथे राहणारे सहायक निरीक्षक हे पूर्वी लष्करात होते. 19 वर्ष लष्करात सेवा केल्यानंतर ते 2009 साली मुंबई पोलीस दलात रुजू झाले होते. सध्या ते समतानगर पोलीस ठाण्यात सहायक निरीक्षक म्हणून कार्यरत होते. 26 जूनला त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी कांदिवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. उपचारा दरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या