प्लॅस्टिकबंदीचा दंड न भरणाऱया 137 जणांना पालिकेने कोर्टात खेचले

37

सामना ऑनलाईन | मुंबई

राज्यात २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदीची १०० टक्के अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पालिकेकडून सर्व २४ विभागांत जोरदार कारवाई सुरू आहे. १९ जुलैपर्यंत २८ दिवसांच्या कारवाईत तब्बल ४० लाख ८० हजारांची दंडवसुली करण्यात आली असून प्लॅस्टिकबंदीचा दंड भरण्यास नकार देणाऱ्या १३७ जणांना पालिकेने कोर्टात खेचले आहे. आगामी काळात ही कारवाई आणखी तीव्र होणार आहे.

शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतील ‘प्लॅस्टिकबंदी’ पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी जाहीर केल्यानंतर सर्व स्तरातून या निर्णयाचे जोरदार स्वागत झाले आहे. मुंबईत धडक कारवाईसाठी पालिकेने निरीक्षकांची फौज तयार केली आहे. मुंबईभरात पालिकेच्या ३१० निरीक्षकांकडून प्लॅस्टिकबंदीविरोधात ही कारवाई करण्यात येत आहे. मार्केट, परवाना विभाग आणि आस्थापना विभागातून या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. निरीक्षकांची नावे आणि मोबाईल क्रमांक पालिकेच्या वेबसाइटवर देण्यात आले आहेत. निळा कोट आणि काळी टोपी घातलेल्या निरीक्षकांकडून व्यावसायिक, दुकानदारांवर धाडी टाकून ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान पहिल्याच वेळी करण्यात येणाऱया पाच हजारांच्या दंडामुळे मोठी रक्कम जमा होत आहे.

कारवाईसाठी निरीक्षकांना हवेय पोलीस संरक्षण 

> प्लॅस्टिकबंदीनंतर कारवाईसाठी पालिकेने निरीक्षक नियुक्त केले असले तरी कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग ओढवत असल्याचे निरीक्षक खासगीत सांगत आहेत.
> काही ठिकाणी कारवाईत जाणीवपूर्वक अडथळा आणला जातो तर काही ठिकाणी दमदाटी-दादागिरी करून कारवाईला विरोध केला जातो.
> त्यामुळे कारवाई करणारे निरीक्षक आपल्याला कारवाईदरम्यान पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी करीत आहेत.
> या पार्श्वभूमीवर काही निरीक्षकांनी याबाबत उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांची भेट घेऊन पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

अशी झाली कारवाई

> एकूण भेटी दिलेल्या आस्थापनांची संख्या – ९८ हजार ८९६
> आकारलेला दंड – ४० लाख ८० हजार
> न्यायालयीन कारवाई प्रकरणे – १३७
> जप्त केलेले प्लॅस्टिक – ३५४७.५६१ किलो

आपली प्रतिक्रिया द्या