क्लीन अप मार्शलविरोधात तक्रारी आल्यास कंत्राटदाराला 20 हजारांचा दंड

सामना प्रतिनिधी, मुंबई

क्लीन अप मार्शलकडून होणारी मनमानी कारवाई आणि कामात होणाऱया दिरंगाईविरोधात पालिकेकडून आता कठोर कारवाई होणार आहे. यामध्ये क्लीन अप मार्शलविरोधात तिसऱ्यांदा तक्रार आल्यास कंत्राटदाराला दहा ते वीस हजारांचा दंड होणार असून त्याला ‘काळ्या यादी’तही टाकण्यात येईल. ‘क्लीन अप’ मार्शलविरोधात वाढलेल्या तक्रारींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत नागरिक, प्रवासी आणि वाहतूकदारांकडून होणाऱ्या अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने 2007 पासून ‘क्लीन अप’ मार्शल संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र या ‘क्लीन अप’ मार्शलकडून मोठय़ा प्रमाणात ‘वसुली’ होत असल्याचा तक्रारी येत असतात. काही वेळा क्लीन अप मार्शलविरोधात थेट पोलीस तक्रारी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे कंत्राटदाराला हे काम वाढवून देताना नगरसेवकांनीही जोरदार विरोध केला आहे. मात्र मुंबईतील स्वच्छतेच्या दृष्टीने ‘क्लीन अप’ मार्शलची अनिवार्यता लक्षात घेऊन ‘एन’ आणि ‘बी’ वॉर्ड वगळता सर्व वॉर्डांमध्ये प्रत्येकी 20 ते 22 ‘क्लीन अप’ मार्शल सध्या काम करीत आहेत. रहिवासी, प्रवासी अस्वच्छता करताना आढळल्यास त्यांच्याकडून रोख दंडही वसूल केला जात आहे. मात्र या क्लीन अप मार्शलच्या मनमानीविरोधात वाढलेल्या तक्रारींची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. यामध्ये एखाद्या कंत्राटदाराविरोधात तिसऱ्यांदा तक्रार आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.

काही ठिकाणी क्लीन अपकडून असमाधानकारक काम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कारवाईसाठी नियमावली बनवण्यात येत आहे. यामध्ये एखाद्या कंत्राटदाराविरोधात तिसऱ्या वेळी तक्रार आल्यास दहा ते वीस हजारांचा दंड आणि ‘काळय़ा यादी’त टाकण्याची कारवाई करण्यात येईल. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
-विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त

सध्या क्लीन अप मार्शलकडून होणारी कारवाई
रस्त्यावर थुंकताना आढळल्यास 200 रुपयांचा रोख दंड.
उघड्यावर लघवी करताना आढळल्यास 200 रुपये दंड.
पाळीव कुत्र्याने घाण करताना आढळल्यास 500 रुपयांचा दंड.

या ठिकाणी करा तक्रार
क्लीन अप मार्शलविरोधात नागरिकांना संबंधित वॉर्ड ऑफिसमध्ये तक्रार करता येईल. शिवाय पालिकेच्या वेबसाइटवरील 108 क्रमांकावर आणि डिझास्टरच्या 1916 क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.

summary-BMC to take action against clean up marshal for false charges

आपली प्रतिक्रिया द्या