बॉडी बिल्डींगसाठी वापरलं घोड्याचं इंजेक्शन, पोहोचला थेट रुग्णालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सगळं काही फास्ट मिळवण्याच्या नादात आजची तरुण पिढी कितीही वाहवत जाऊ शकते. पण, झटपट गोष्टी मिळवण्याच्या नादात अनेकदा फसगत होण्याची शक्यता असते. असंच दिल्ली येथील एका तरुणासोबत झालं आहे. बॉडी बिल्डींगसाठी घोड्याचं इंजेक्शन वापरल्याने त्याच्यावर रुग्णालयात शारीरिक आणि मानसिक उपचार करण्याची वेळ आली आहे.

सन्नी (21) असं या तरुणाचं नाव असून त्याला शरीर सौष्ठव कमवण्याचा नाद होता. त्यामुळे त्याच्या प्रशिक्षकाने त्याला AMP5 कंपाउंड हे औषध घेण्याचा सल्ला दिला. हे औषध इंजेक्शनच्या साहाय्याने सन्नी नियमित घेऊ लागला. त्याचा परिणामही त्याच्यावर दिसू लागला. तो न थकता व्यायाम करत असे. त्यामुळे त्याने त्याचा खुराकही वाढवला होता. त्या आधारावर सन्नीने स्पर्धेत नावही कमावलं. पण, जेव्हा शरीर सौष्ठवाचा त्याला कंटाळा आला आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचं त्याने निश्चित केलं, तेव्हा मात्र त्याला ते इंजेक्शन सोडवेनासं झालं.

तरीही त्याने मोठ्या प्रयत्नानिशी इंजेक्शन घेणं कमी करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम त्याच्या झोपेवर होऊ लागला. फक्त इंजेक्शन घेऊन शरीराला व्यायामाची सवय लागल्याने त्याचं शरीर आळशी बनू लागलं, त्याची चिडचिड होऊ लागली. हळूहळू त्याच्या मनावरही याचा परिणाम झाला आणि शेवटी त्याला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, AMP5 कंपाउंड हे इंजेक्शन घोड्यांना दिलं जातं, जेणेकरून त्यांनी न थकता मेहनत करावी. या कंपाउंडची औषध तोंडावाटे घेता येतात, पण काही अपवादात्मक परिस्थितीतच ती मनुष्याला दिली जातात. पण, सन्नीने ती घेतल्यामुळे त्याच्या शरीरावर विपरित परिणाम झाले आहेत. हे औषध स्टेरॉईडपेक्षाही घातक असून ते दीर्घकाळ घेत राहिल्यास त्याचा किडनी आणि इतर मुख्य अवयवांवर परिणाम होतो, अशी माहिती सन्नीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांन दिली आहे.

summary- body builder use injection resulted hospitalization