
अवघ्या चार हजार रुपयांत कोणालाही बनावट आधार आणि पॅनकार्ड बनवून देणाऱया टोळीचा गोरखधंदा बोरिवली पोलिसांनी उद्ध्वस्त केला. शामजय लोखंडे आणि रामचंद्र धुरी अशी त्या बनावटगिरी करणाऱया दोघांची नावे असून त्याना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बोरिवली परिसरात काही जण कोणतेही कागदपत्र न तपासता आधार आणि पॅनकार्ड बनवून देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक निनाद सावंत याच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी बनावट ग्राहक बोरिवली कोर्टाजवळच असलेल्या सागर झेरॉक्स सेंटरमध्ये पाठवले. तेथे त्याची भेट लोखंडेशी झाली. ग्राहकाने आधारकार्ड बनवून हवे असल्याचे सांगितले. त्यानंतर लोखंडेने आधारकार्ड बनवण्यापूर्वी पॅनकार्ड बनवावे लागेल. त्यासाठी चार हजार रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले.
चार हजार रुपयांत सौदा झाल्यावर मंगळवारी लोखंडे हा बोरिवली परिसरात आधारकार्ड घेऊन आला होता. तेव्हा पोलिसांनी लोखंडेला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने बनावट आधारकार्ड बनवल्याची कबुली दिली. त्याच्या चौकशीत धुरीचे नाव समोर आले. त्यालादेखील पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्या दोघांनी किती जणांना बनावट आधारकार्ड बनवून दिले याचा तपास बोरिवली पोलीस करत आहेत. पोलिसांनी आरोपींकडून पेनड्राइव्ह आदी साहित्य जप्त केले आहे.

























































