कृष्णा सहकारी साखर कारखान्यात 600 सभासद बोगस; तक्रार दाखल

कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे सुमारे 600 पेक्षा जास्त व्यक्तींना “अ”वर्ग सभासद करण्यात आले आहे. या प्रकरणात कारखान्याची पात्र सभासदांची, त्यांच्या हक्कांची, अधिकाराची व कारखान्याची फसवणूक झाली असल्याबद्दल चौकशी करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

30 मार्च 2016 ते 20 ऑगस्ट 2018 या काळात संचालक मंडळाच्या झालेल्या एकूण बैठकीतील 19 बैठकांमध्ये कारखान्याच्या संचालक मंडळाने पात्र नसताना सुमारे सहाशेपेक्षा जास्त व्यक्तींना कारखान्याचे “अ” वर्ग सभासद केले आहेत. सभासद होण्यासाठी कार्यक्षेत्रात कमीत कमी 10 गुंठे पिकाऊ जमीन असणे आवश्यक आहे. तसेच संबंधीत व्यक्ती कुळ, सहहिस्सेदार, संरक्षित कुळ असेल तर त्याची 7/12 उताऱ्यात नोंद असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 7/12 वर कोणत्या ना कोणत्या स्वरुपात सभासद होणाऱ्या व्यक्तीची नोंद असणे आवश्यक आहे.

उपलब्ध झालेल्या महसुली दप्तरातील माहितीनुसार यादीतील व्यक्तींच्या नावे जमीन नाही. एकत्र कुटुंब असल्यास तेवढे धारणक्षेत्र नाही. यादीनुसार संबंधित व्यक्तींना देण्यात आलेले सभासदत्व कायद्यानुसार अयोग्य आहे. तसे पुरावे आहेत. बोगस, बनावट कागदपत्रांच्या आधारे कृष्णा कारखान्याच्या सभासदांची फसवणूक झाली आहे. बोगस सभासद करुन कारखान्याच्या अस्तित्व आणि भवितव्याविषयी शंका आहे.

उपलब्ध कागदपत्रांनुसार अपात्र व्यक्तींना सभासद करण्यात आले आहे. त्यातील बहुतांश व्यक्ती एका ट्रस्टचे कर्मचारी आहेत. यासंदर्भात सध्या कारखान्याकडून काही कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात येत आहेत. गरज पडल्यास सुमारे 45 गावातील तलाठ्यांकडूनही माहिती घेणे आवश्यक आहे. अपात्र व्यक्तींना कारखान्याचे सभासदत्व देण्यात आल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले, शेअर कमिटीचे संचालक, कार्यकारी संचालक, सचिव यांची सखोल चौकशी करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. याप्रकरणी सर्व ते आवश्यक पुरावे तारीख, वार व सुस्पष्ट अभिप्रायासह आमच्याकडे आहेत. सदर पुराव्यासह पोलीस ठाण्यात वेळोवेळी हजर राहीन. असा तक्रार अर्ज प्रशांत रंगराव पवार बेलवडे बुद्रुक (ता. कराड) यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या