
ईडीच्या धाडी, त्याचा तपास तसेच त्यातून होणार्या शिक्षा याबद्दल संभ्रम असतानाच आता ईडीच्या बोगस नोटिसाही येऊ लागल्या आहेत. नांदेड येथे गुंठेवारीच्या प्रकरणात माजी नगरसेवकाला ईडीच्या नावाने चौकशीला हजर राहण्यासाठी चक्क बोगस नोटीस पाठवण्यात आली! या प्रकरणात नांदेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
नांदेड-वाघाळा महापालिकेत गुंठेवारीचा मोठा घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीच्या पथकाने मनपा तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याकडून माहितीही घेतली होती. मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वजिराबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी यांचे जबाबही नोंदवण्यात आले. ईडीच्या पथकाने कागदपत्रांचे भेंडोळेही सोबत नेले. चौकशी सुरू असली तरी या प्रकरणात आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
गुंठेवारी घोटाळा प्रकरणात मनपाचे माजी नगरसेवक शमीम अब्दुल्ला यांना निखिलकुमार गोविला यांच्या स्वाक्षरीने २८ मार्च रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी एक नोटीस मिळाली. स्पीड पोस्टाने ही नोटीस पाठवण्यात आली. या प्रकरणात आपला कवडीचाही संबंध नसताना ईडीची नोटीस आल्याने शमीम प्रचंड घाबरले. त्यांनी यासंदर्भात ईडी कार्यालयात चौकशी केली. मात्र तेथे अशी कोणतीही नोटीस बजावण्यात आली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. ईडीची नोटीस बोगस असल्याचे स्पष्ट होताच त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेतली. त्यानंतर इतवारा पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार नोंदवली. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू होती.