सिरसाळ्यात परीक्षा केंद्रावर बोगस परीक्षार्थी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळी तालुक्यातील सिरसाळा येथे सोमवारी धक्कादायक प्रकार समोर आला. दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी आग्रही असणाऱ्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या भेटीदरम्यानच एका परीक्षा केंद्रावर बोगस परीक्षार्थी आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सिरसाळा येथील न्यू हायस्कूल या परिक्षा केंद्रावर अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान सिरसाळा परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थीच्या नावावर दुसराच तोतया परीक्षार्थी परीक्षेला बसल्याचे तपासणीत उघड झाले. अण्णासाहेब मोतीराम कदम याच्या जागेवर तोतया विद्यार्थी अमर मोतीराम महात्मे हा परीक्षा देत असल्याचे आढळून आले. तोतया परीक्षार्थी आढळून आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र संचालकासह सहसंचालक आणि पर्यवेक्षक यांना कठोर शब्दांत समज दिली आहे.

या प्रकरणी दोन्ही विद्यार्थ्यांवर सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी आल्यानंतर केंद्र संचालक, सहसंचालक आणि गार्डीग शिक्षकांनी संबंधित तोतया विद्यार्थ्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यासह तोतया विद्यार्थ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने परिक्षेतील घडणारे अनुचित प्रकार समोर आले आहेत. घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.