
अहिल्यानगर, दि. 15 (प्रतिनिधी) – बोल्हेगाव एमआयडीसी परिसरात राहणाऱया एका महिलेचा घरात घुसून गळा चिरून खून केल्याच्या गुह्याची स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत उकल करत चार युवतींच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दि. 12 डिसेंबर 2025 रोजी मनीषा बाळासाहेब शिंदे (वय 40, रा. कौस्तुभ कॉलनी, बोल्हेगाव) या आपल्या घरी असताना अज्ञात आरोपींनी घरात घुसून त्यांच्या गळ्यावर व हनुवटीवर धारदार शस्त्र्ााने वार करत खून केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार तपासासाठी स्थानिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना या घटनेत दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे (वय 20, रा. बालाजीनगर, बोल्हेगाव) हिचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आज दिव्या देशमुख हिच्यासह अंजुम ऊर्फ मेहक अहमद सैफी (वय 22, रा. मोरया पार्क, बोल्हेगाव. मूळ रा. दिल्ली) विधिसंघर्षित बालिका (वय 16) विधिसंघर्षित बालिका (वय 16) या चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपी दिव्या देशमुख हिने खुनाची कबुली दिला. मयत महिला तिच्या माहेरच्या शेजारी राहत असून, तिच्याकडे दागिने असल्याची माहिती होती. दागिने चोरण्याच्या उद्देशाने सर्व आरोपी महिलांनी घरात प्रवेश केला. दागिने काढताना मयत महिलेने आरडाओरडा केल्यामुळे आरोपींनी तिच्यावर धारदार शस्त्र्ााने वार करून खून केला. ताब्यातील आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई केली.

























































