
न्यायालयांना आणि बँकांना टार्गेट करत मुंबई हायकोर्ट, दंडाधिकारी न्यायालये व दक्षिण मुंबईतील बँका बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल अज्ञातांकडून आज धाडण्यात आला. या धमकीनंतर न्यायालये, बँका तातडीने रिकामी करण्यात आल्या. तपास यंत्रणांनी शोधमोहीम हाती घेत संपूर्ण इमारत पिंजून काढली, मात्र ही अफवा असल्याचे अखेर उघड झाले.
नियमित कोर्टाचे कामकाज सुरू असतानाच मुंबई उच्च न्यायालयासह सत्र न्यायालय, माझगाव व एस्प्लेनेड न्यायालय, वांद्रे आणि अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयांना तसेच येथील बँकांना बॉम्ब असल्याचा ई-मेल प्राप्त झाला. या ई-मेलनंतर कोर्टाचे कामकाज तातडीने थांबवण्यात आले व संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. कोर्टाबाहेर याचिकाकर्ते, वकील तसेच कर्मचाऱयांची प्रचंड गर्दी झाली होती.
बँकेतील कर्मचारी आणि ग्राहकांनादेखील येथून हटवण्यात आले पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाने श्वानांच्या सहाय्याने दोन तास संपूर्ण न्यायालय व परिसर पिंजून काढला, मात्र त्यांना हाती काहीच सापडले नाही. सखोल चौकशीअंती ही अफवा असल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात व अन्य न्यायालयांत नियमित कामकाजास पुन्हा सुरुवात करण्यात आली.
कोर्ट रूम रिकामी
नियमित कामकाज सुरू असतानाच धमकीचा ई-मेल मिळाल्याने कोर्टासह पोलीस अधिकाऱयांची धावपळ उडाली. पोलीस यंत्रणा प्रत्येक कोर्ट रूम रिकामी करण्यासाठी धावपळ करत होते. त्यामुळे उपस्थितांमध्ये घबराट पसरली होती. या घटनेनंतर न्यायालयातील सुनावण्या तातडीने स्थगित करण्यात आल्या. मात्र ही अफवा असल्याचे लक्षात येताच प्रत्येकाने सुटकेचा निःश्वास सोडला.



























































