दंगलीच्या गुह्यातील दोषत्वाची माहिती लपवली! नरेश म्हस्केंना हायकोर्टाचे समन्स

ठाणे लोकसभा मतदारसंघातील मिंधे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. म्हस्के दंगलीच्या गुह्यात दोषी ठरले होते. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना ही माहिती लपवली, असा आरोप विचारे यांनी केला आहे. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत म्हस्के यांना समन्स बजावले.

राजन विचारे यांनी ज्येष्ठ वकील दारियस खंबाटा यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. म्हस्के यांची खासदारकी रद्द करा, त्यांचा विजय अवैध ठरवून विचारे यांना विजयी घोषित करा, अशी मागणी याचिकेतून केली आहे. त्यांच्या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्यापुढे सुनावणी झाली. म्हस्के यांनी कुठल्याही गुह्यात दोषी न ठरल्याचे उमेदवारी अर्ज भरताना जाहीर केले.

वास्तविक त्यांना दंगलीच्या गुह्यात कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले होते. नंतर त्या दोषत्वाविरोधातील अपील ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळले होते, असे याचिकेतून न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. याची गंभीर दखल न्यायमूर्ती छागला यांनी घेतली आणि नरेश म्हस्के यांच्यासह इतर 22 उमेदवारांना समन्स बजावले. म्हस्के यांनी 4 सप्टेंबरपर्यंत राजन विचारे यांच्या याचिकेतील आरोपांवर उत्तर सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.