
खोट्या नावाने बनावट तक्रार करणाऱयाला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. या तक्रारदाराला पंधरा दिवस जे.जे. रुग्णालयाची सफाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
न्या. रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. या आदेशाचे पालन न केल्यास न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. महेंद्र शर्मा असे या तक्रारदाराचे नाव आहे. सलग पंधरा दिवस दिवसातून तीन तास शर्माने जे.जे. रुग्णालयात लादी पुसण्यापासून सफाईची अन्य कामे करावीत. पंधरा दिवसांनंतर रुग्णालय प्रशासनाने याचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे खंडपीठाने आदेशात नमूद केले.
काय आहे प्रकरण
महेंद्रने सुनील शर्मा नावाने एका हिंदी मालिकेविरोधात पोलिसांत तक्रार केली. मालिकेमुळे जनमानसाच्या भावना दुखावल्या जातात, असा आरोप शर्माने केला. त्यानुसार पोलिसांनी मालिकेवर निर्बंध घातले. त्याविरोधात खासगी चॅनेलने याचिका दाखल केली होती. चुकीच्या नावाने खोटी तक्रार केल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले.
तपास अधिकाऱ्यावर कारवाई
या तपासात कसूर केल्याप्रकरणी तपास अधिकारी प्रफुल्ल वाघ यांच्याविरोधात कारवाई केली जाईल, अशी हमी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात दिली.