
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांनी दक्षिण मुंबईतील रस्ते आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मोकळे करावेत, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावर परवानगी आहे. तेथील जागा वगळता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, मरीन ड्राइव्ह व आसपासचा परिसर आंदोलकांनी रिकामा करावा, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले. तसेच मुंबईत कोणत्याही मराठा आंदोलकाला येऊ देऊ नका. मुंबईच्या वेशीवरच या आंदोलकांना रोखा, असे न्यायालयाने राज्य शासनाला बजावले आहे.
मराठा समाजाला ओबीसी कोटय़ातूनच आरक्षण द्यावे या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत आले आहेत. त्यांच्या गर्दीने आझाद मैदानासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते व्यापून गेले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडचण येत असल्याचा दावा करत दाखल याचिकांवर आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आंदोलकांना आझाद मैदानावरून अन्यत्र हलवण्यात यावे अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.
पोलिसांना समजून घ्या
मुंबईत गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जातो. सध्या गणेश विसर्जन सुरू आहे. लोक गणेश दर्शनासाठी बाहेर पडत आहेत. असे असताना पोलिसांनी आंदोलकांवर काही कारवाई केली आणि परिस्थिती चिघळल्यास वातावरण बिघडू शकते. त्यामुळे पोलिसांना समजून घ्यायला हवे, अशी विनंती महाधिवक्ता सराफ यांनी केली.
वानखेडे, ब्रेबॉर्न स्टेडिअमला नकार
आंदोलकांची गैसयोय होते आहे. त्यामुळे या आंदोलकांना वानखेडे, ब्रेबॉर्न स्टेडिअममधील आसन व्यवस्थेवर थांबण्याची व्यवस्था राज्य शासनाने करावी, असा पर्याय न्यायालयाला देण्यात आला. त्यास न्यायालयाने नकार दिला. आंदोलक रस्त्यावर क्रिकेट, कबड्डी, खो-खो खेळत आहेत. त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यांची व्यवस्था या स्टेडिअमवर केली तर ते तेथे क्रिकेट खेळतील. परिणामी हा पर्याय मान्य करताच येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
आंदोलकांनी नियमांचे उल्लंघन केले; न्यायालयानेच आदेश द्यावेत
आझाद मैदानावर पाच हजार जणांनाच आंदोलन करण्याची परवानगी आहे. घोषणाबाजी करू नये. काठ्या, लाऊड स्पीकर आणू नये, यासह अन्य कडक नियम आहेत. या नियमांचे पालन केले जाईल, अशी हमी मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. त्यांना आंदोलनासाठी एकच दिवस परवानगी देण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची नोटीस जरांगे पाटील यांना पोलिसांनी दिली होती. ही नोटीस त्यांनी घेतली नाही. त्यामुळे आंदोलकांना आझाद मैदान येथून काढण्यासंदर्भात न्यायालयानेच आदेश द्यावेत, अशी विनवणी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी केली.
न्यायालयाच्या आदेशात काय?
- आंदोलकांसाठी पाणी, जेवण आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करा.
- मनोज जरांगे यांना आवश्यक असतील ते सर्व वैद्यकीय उपचार द्या.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, मरीन ड्राईव्ह व आसपासचा परिसर आंदोलकांनी सोडावा.
- आंदोलनकर्त्यांवर संयोजकांनी नियंत्रण ठेवावे.
- रस्ते अडवू नका, मुंबईची दिनचर्या थांबवू नका.
- 5 हजारपेक्षा जास्त आंदोलक मुंबईत नसावेत याचे पालन करा.
मराठा आंदोलकांना आझाद मैदान रिकामी करण्याचे आदेश देऊन त्यांची अन्यत्र व्यवस्था करावी, अशी मागणी करणाऱया याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी खास न्या. घुगे व न्या. अंखड यांच्या खंडपीठाची स्थापना न्यायालयाने केली.
आंदोलनाचे विविध फोटो, व्हिडिओ न्यायालयाला दाखवण्यात आले. त्याची न्यायालयाने दखल घेतली. अशा पद्धतीने आंदोलन होत असेल तर राज्य शासन त्यावर काय तोडगा काढणार? असा सवाल न्यायालयाने केला.
न्यायालयासही घेरलेय, हेच आहे का तुमचे शांततापूर्ण आंदोलन?
न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायालयाबाहेर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. त्या घोषणाबाजीचा आवाज न्यायालयातही ऐकू येऊ लागल्याने हेच का तुमचे शांततापूर्ण आंदोलन? अशी विचारणा न्यायमूर्तींनी केली. न्यायालयात येत असताना आपलीही वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती असेही न्यायमूर्तींनी आंदोलनकर्त्यांच्या वकिलांच्या निदर्शनास आणून दिले. मराठा आंदोलनासंदर्भात दाखल सर्व याचिकांवर आता उद्या दुपारी 1 वाजता सुनावणी होणार आहे.
आंदोलन आझाद मैदानातच व्हावे, बाहेर नको!
प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण आंदोलनाचा त्रास इतरांना होता कामा नये. याचा समतोल राखण्यासाठीच आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनही आझाद मैदानातच व्हावे, असे न्यायालयाने सांगितले. आझाद मैदानाशिवाय अन्यत्र आंदोलक उतरले तर उद्या विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजांमध्ये जाता येणार नाही. दूध आणि भाजीपाल्याच्या गाडय़ा मुंबईत आल्या नाहीत तर काय होईल, अशी विचारणा न्यायालयाने केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार
मुंबई उच्च न्यायालयाने काही अटी शर्ती घालून मराठा आंदोलनाला परवानगी दिली होती. परंतु अटी शर्तींचे पालन झाले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मंगळवारी दुपारी चारपर्यंत पाच हजार आंदोलकांशिवाय इतर आंदोलकांना मुंबईतून बाहेर पाठविण्याचे न्यायालयाने सांगितल्यानंतर शासन न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जरांगेंचे आंदोलकांना आवाहन, शेवटचं सांगतोय, आंदोलनाला बदनाम करू नका… मुंबईकरांना त्रास होईल असे वागू नका!
मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका, कुणाचं ऐकून गोंधळ घालू नका, असे आवाहन उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांनी आंदोलकांना केले. समाजाचा अपमान होईल, मान खाली जाईल असं वागू नका. आंदोलनाला बदनाम करू नका, अन्यथा सोडणार नाही. शेवटचं सांगतोय, अशी तंबीही त्यांनी दिली. कुणी ऐकणार नसेल तर त्याने गावाकडे परत जावं, कुणाच्या आदेशावर हुल्लडबाजी करणाऱ्यांंना स्थान नाही, असे जरांगे म्हणाले. जरांगे यांच्या आकाहनानंतर आझाद मैदान आणि परिसरातील रस्त्यांकर असलेल्या आंदोलकांची गर्दी केगाने ओसरली. दक्षिण मुंबईतील बहुतांश रस्ते मोकळे झाले. त्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
जरांगे यांची प्रकृती ढासळली, रक्तदाब कमी झाला
चार दिकस उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत चालली आहे. आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचे दिसून आले. तरीही आपल्याला काहीच झाले नाही, आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील असे जरांगे यांनी सांगितले. याकेळी डॉक्टरांकडील तुटक्याफुटक्या तपासणी यंत्रांबद्दलही त्यांनी आक्षेप घेतला. सरकार मुद्दाम असे करतेय, असा आरोप त्यांनी केला. सर्व डॉक्टरांना निलंबित करा, अशी मागणी जरांगे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली.