अशीही स्वरसाधना…

>> नमिता दामले

सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी यांच्या सुरेल मैफलींचा स्वर रंगत जाऊन त्यांनी हजारापर्यंत मजल कशी मारली याचा प्रवास म्हणजे मुक्काम पोस्ट 1000.

अनिरुद्ध जोशींना संगीताचा वारसा आणि वसा त्यांची आई गायिका ललिता जोशी यांच्याकडून प्राप्त झाला. शास्त्रीय संगीतासाठी विनायक काळे तर गझल गायकीसाठी श्रीकांत ठाकरे यांच्यासारखे गुरू लेखकाला लाभले. वडिलांच्या इच्छेचा आदर राखून व्ही.जे.टी.आय.मधून इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतरही व्यावसायिक गायक बनण्याचीच लेखकाची आकांक्षा होती म्हणून मग वडिलांनीही विरोध केला नाही. शाळा आणि कॉलेजमध्येही गायन कलेला भरपूर वाव मिळाला. अनेक स्पर्धांमधून पारितोषिके मिळाली. गुरुतुल्य पिता आणि गायन गुरूंनीही कार्यक्रम करण्याची घाई करायची नाही, फक्त उत्तम रियाज करीत राहायचा असा सल्ला दिला. गायन मंडळी उत्तम जगल्यामुळे रियाजामध्ये खंड पडला नाही. रेडिओच्या ऑडिशनमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे रेडिओवर गाण्याची संधी मिळाली.

कार्यक्रम करण्याची अधीरता होती. मग संधीची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच स्वतःच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेणे, गाण्यांची कॅसेट काढण्यासाठी कंपनी काढणे, प्रथम 100 व नंतर 1000 कार्यक्रम करण्याचा संकल्प करून त्यादृष्टीने वाटचाल करणे आणि हे सगळे करताना व्यावसायिक दृष्टिकोनही जपणे हा सगळा खटाटोप प्रत्यक्ष वाचल्याशिवाय समजणार नाही. होतकरू कलाकारांना यातून बरेच काही शिकायला मिळेल.
स्वरसाधनेसाठी पुरेसा वेळ देता यावा म्हणून व्यवसायातील वेळेची गुंतवणूक कमी करणे, लेखकाला आधी नीट अभ्यास करून भरघोस गुंतवणूक केल्यामुळे शक्य झाले आणि जोशी सरांनी स्वतःची संगीत अकादमी सुरू केली. संगीतावरच्या निष्ठेचे चीज घडावे यासाठी उत्तमोत्तम कलाकार तयार करून त्यांना गाण्याची संधी देण्यासाठी उत्तमोत्तम कार्यक्रम करण्याचा लेखकाचा हा प्रवास अवश्य समजून घ्यावा.

मुक्काम पोस्ट 1000
लेखक – अनिरुद्ध जोशी
प्रकाशन – व्यास क्रिएशन्स, ठाणे
पृष्ठ – 168 मूल्य – 280 रुपये