परीक्षण – बावनकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> साबिर सोलापुरी

सध्याच्या कवयित्रींमध्ये दौंडच्या अनिसा शेख हे आघाडीचे नाव आहे. ‘आपुलाचि संवाद आपणाशी’ असे न म्हणता थेट वाचकांच्या हृदयाशी संवाद साधणारा त्यांचा ‘संवाद हृदयाशी’ हा पहिला कवितासंग्रह आश्वासक आहे. त्यात नवखेपणाच्या खुणा अभावानेच आढळतात. म्हणून त्याचे मनःपूर्वक स्वागत करायला हवे. त्या सतत काव्यसृजनाच्या ध्यासात असतात. कविता त्यांच्या ध्यानीमनी रेंगाळत असते. कविता हीच जणू त्यांची प्राणसखी आहे. घर संसारातले सुख-दुःख असो, वा सामाजिक चिंतेचा विषय असो, त्या कवितेलाच सांगतात. तिच्याशी हृदयातून बोलतात. त्यांच्या प्रतिभेला कवितेचा कोणताही विषय, प्रकार वर्ज्य नाही. प्रासादिक शब्द, हळुवार सखोल भावना, समर्पक मांडणीतून त्यांचे काव्यसामर्थ्य प्रकट होते. ही बावनकशी कविता आहे.

कवितेचा स्वर हृदयाशी जुळला की, मग ती शब्दवीणा होऊन झंकारत राहते. हृदयाची तार छेडते. कवितेच्या उत्तमोत्तम मैफली झडत जातात. अनुभवसिद्ध कवितांनी दुसऱयांना विशुद्ध आनंद वाटत राहतात. दुसऱयांना आनंद देणे यापेक्षा दुसरा आनंददायी सोहळा नाही. सच्च्या कवितेच्या अनुभूतीला उपमा, अलंकाराची गरज नाही भासत. अनिसा शेख यांना अवजड, दुर्बोध शब्दांचा सोस नाही. साध्यासोप्या रसाळ शब्दात हृदयातलं हृदयाला सांगून टाकणं एवढंच त्यांच्या काव्यलेखनाचं प्रयोजन आहे. प्रयोजन पक्पं असलं की, प्रयोगाची उगाच मांडामांड करण्याची आवश्यकता नसते. प्रयोग टाळूनही कवितेच्या आशयाचा योग जुळवून आणता येतो. या कवयित्री श्रृंगारप्रधान लावणीपासून वीररसाने ओथंबलेला पोवाडाही तितक्याच खुबीने लिहिण्यात तरबेज आहेत. कवयित्रीने विविध विषयांवर अनेक आशयसंपन्न कविता लिहिल्यात.

माय मराठीवर, देशावर त्यांचं पहिलं प्रेम आहे. आपण हिंदुस्थानवासी असल्याचा त्यांना अभिमान आहे. स्वातंत्र्यदिन, संविधान, लोकशाही, मतदान यांसारखे महत्त्वपूर्ण विषय त्यांना जवळचे वाटतात. मातीच्या अन् मातेच्याही कविता त्यांनी लिहिल्यात.

आम्ही आहोत भारतीय आम्हा त्याचा अभिमान
दिली प्राणाची आहुती कार्य वीरांचे महान

वीरांनी प्राणांची आहुती देऊन गुलामीच्या बेडय़ातून आपली सुटका केली. त्यांच्यामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. देशाचा तिरंगी झेंडा सदैव उंच फडकत राहो असे त्यांना वाटत राहते.

निसर्गाचे चक्र आपली किमया अविरतपणे दाखवत आले आहे. या चक्रात मातीची भूमिका महत्त्वाची आहे. सगळय़ांची निष्ठा मातीशी आहे. प्रत्येकाची नाळ मातीशी जोडलेली असते. काळय़ा आईच्या कृपेने आपले पोषण होत असते. माती तिच्या लेकरांना कधीच उपाशी नाही ठेवत. मातीचे हे औदार्य कुणीच नाकारू नाही शकत, याची कवयित्री आवर्जून दखल घेते.

सोनं डोलतंय शेतात सपान झालंया साकार
काळय़ा मायेच्या कृपेने सुखी झालाय परिवार

आईनेच आपल्याला जग दाखवले. स्वतः खस्ता खाऊन आपल्याला जिवापाड जपले. प्रत्येकालाच आईविषयी कृतज्ञता वाटावी, परंतु आजच्या काळात आईच्या हालअपेष्टा विसरून आई कुठे काय करते, असा प्रश्न जेव्हा मुले विचारतात, तेव्हा आई काय नाही करत याची अंतर्मुख करणारी जंत्रीच कवयित्री देते.

जन्मा अगोदरपासून सारे आईच तर करते
तरी विचारता… आई कुठं काय करते

आजची नारी अबला नाही ती सबला आहे. नारीची शक्ती अफाट आहे, ती स्वयंसिद्धा आहे. हिंदुस्थानी इतिहास महिलांनीच आपल्या पराक्रमाने सुवर्णाक्षरांत लिहिला आहे. कर्तबदारी दाखविण्यात ती कुठेच तसूभरही कमी नाही पडत. तिचा अबला म्हणून अव्हेर करणे ही पुरुषांसाठी कमीपणा आणणारी गोष्ट आहे. महिलांची थोरवी विशद करताना अनिसा शेख लिहितात.

जीजा, रमाचा अभिमान नारी
कोमल कधी रणचंडी नारी
रणक्षेत्रात लढणारी झाशीची राणी
वज्ररूपी दुर्गेचे रूप नारी

दसरा, दीपावली, बैलपोळा, मकरसंक्रांत, श्रावण आदी सणावारही कवयित्रीला परके नाही वाटत. या सणांचे महात्म्य, परंपरा त्या प्रभावीपणे शब्दबद्ध करतात. या कविता अनिसा शेख यांनीच लिहिल्या का, असा प्रश्न पडावा, इतक्या त्या या कवितांशी एकजीव झाल्यात. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाचे हेच खरे वैशिष्टय़ आहे.

महात्मा जोतिबा, सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली, मुलींना साक्षर केले. आद्य शिक्षिका फातिमा शेख यांचाही त्यात तोलामोलाचा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. कवयित्री त्यांच्याशी आंतरिक ओलाव्याने हृदय कृतज्ञतेचा संवाद साधतात. निर्मम स्त्र्ााrभ्रूण हत्येसारखा सद्यकालीन ज्वलंत प्रश्न असो, कामगारांची व्यथा असो, युवकांची वाढती बेरोजगारी असो, अशा कितीतरी समस्यांवर कवयित्री रोखठोक भाष्य नोंदवते. धुंद प्रीतीच्या भावभावना, रूपाचं चांदणं बरसणारी लावणीही त्या रसिकतेनं लिहितात. त्यांची लेखणी फुलत जाते.

रूप तुझं ग देखणं माझ्या हृदयी भरलं
नाक तुझं धारदार माझ्या मनात कोरलं

छंद आणि गेयतेवर त्यांची उत्तम पकड आहे. त्यांच्या काही कविता प्रबोधनाच्या अंगानं जाणाऱया आहेत. केवळ मनोरंजन करणे हा कवितेचा हेतू असता कामा नये. त्यातून प्रबोधनही घडणे अगत्याचे असते. याची पक्व जाण कवयित्री अनिसा शेख यांच्या ठायी आहे.

संवाद हृदयाशी
कवयित्री : अनिसा शेख
प्रकाशक : परिस पब्लिकेशन
पृष्ठे : 96, मूल्य : रुपये 120/-