लालित्यपूर्ण कथा

242

>> डॉ. विजया वाड

आनंदयात्रा. गुरुनाथ तेंडुलकरांचे नवे पुस्तक. रोज नवा दिवस उगवतो व आपल्यासाठी काहीतरी नवे घेऊन येतो. किती अर्थपूर्ण सोपे तत्त्वज्ञान. आनंदयात्री गुरुनाथ तेंडुलकर यांचे ‘आनंदयात्रा’ हे पुस्तक त्यांच्या जीवनाशी साधर्म्य दर्शविणारे आहे.

‘जे मनासी बिलगले… ते शब्दांतुनी प्रकटले। अवघे शब्द आनंदी जाहले… अन् जनांसी साखरेगत वाटले।’

असा सारा आनंदकंदी मामला आहे. त्यांनी लिहिलेल्या, वर्णिलेल्या कथेला पौराणिक संदर्भ असोत किंवा सत्याचे कंगोरे घासून पुसून त्यांनी ते वाचकांसमोर लख्ख मांडलेले असोत, त्यातील वाचनीयता दिसी-माशी वाढता वसा घेते आहे याचा प्रत्यय वाचकांना पुस्तक वाचताना येईल.
यातले ललित लेख विविध नियतकालिकांमधून यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. पण ते पुस्तकरूपाने ‘आनंदयात्रा’मध्ये वाचकांना एकत्र वाचता येतात आणि एक अपूर्व आनंदानुभव खचित प्रत्येक वाचकास मिळतो यात शंका नाही.

‘आतला आवाज’ या लेखात शंकर-पार्वती आणि श्रीगणेश यांच्या गोष्टीचा दाखल देत लेखक ‘ऐकावे जनाचे परि करावे मनाचे’ या दाखल्यापर्यंत येतात.

कारण या गोष्टीत त्या तिघांसोबत नंदी असतो. त्याच्यावर न बसता हे तिघे चालतायत म्हणून लोक त्यांची ‘संभावना’ करतात. मग शंकर नंदीवर बसला तर पहा… नवरेपणा गाजवतो… असं म्हणतात. पार्वती बसली तर… नवरा नि मुलगा चालतायत नि ही पहा…आरामात नंदीवर! असे म्हणतात. गणपतीला बसविले तर आई-बाप चालतायत नि हा मात्र खुश्शाल…. नंदीवर?

पाहिलंत? ‘लोक तैसा ओक हाती धरवेना’ हे खरे म्हणून लेखक या पौराणिक कथेचा दाखला देऊन म्हणतात, ‘‘लोक काय, तुम्ही काहीही केलेत तरी बोलणार, कसेही वागलात तरी त्यावर ‘आपले’ मत व्यक्त करणार! तेव्हा मित्रांनो, आपला आवाज ऐका बरं!’’

‘स’ हित जे लिहिलं जातं ते साहित्य या साहित्याच्या व्याख्येवर माझा ठाम विश्वास आहे. गुरुनाथ तेंडुलकरांचाही यावर नक्कीच विश्वास असावा असे त्यांचे लेखनातून उतरलेले विचार सांगतात. म्हणूनही हे लेखन खूप ‘आपले’ वाटते.

दोन बौद्ध भिक्कूंची गोष्ट सर्वांना ज्ञात आहे. नदीकिनारा ओलांडत असताता त्या दोघांपैकी एक, एका पलीकडे जाऊ इच्छिणाऱया स्त्राrस उचलून घेतो नि या किनाऱयावरून त्या किनाऱयावर सोडतो. हे काम झाल्यावर तो ते मनावेगळे करतो. अगदी सहजपणे. स्वस्थ झोपतोही! दुसरा मात्र उत्तररात्रीपर्यंत त्यास निंदत राहातो. तेव्हा पहिला भिक्कू शांतपणे म्हणतो, ‘‘मी त्या स्त्राrस किनाऱयावरच सोडले. तू मात्र तिला अजूनही मनात वागवीत आहेस.’’

नको त्या गोष्टी मनात ठेवण्याने त्याचा त्रास स्वतःसच अधिक होतो. आपणही पती-पत्नी या नात्यात अनेक नकोशा गोष्टी थेट उराशी बाळगतो. अपमानाचे शल्य, बोच, उराशी का नि कशाला बाळगायची हो? नात्यातल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. जीवन सुखकर होते. प्रिय वाचकांनो, किती मोलाचा सल्ला आहे हा! खरे ना?

गुरुनाथ एक वेधक टीप वाचकांना देतात. आपले जीवन सुखी आणि आनंदी व्हावे असे आपणास वाटते ना वाचकांनो? मग ही टीप नक्की लक्षात ठेवा. ते म्हणतात –

‘‘तुम्ही इतरांसाठी केलेल्या चांगल्या गोष्टी आणि इतरांनी तुमच्यासाठी केलेल्या वाईट गोष्टी विसरून जा. आनंदी व्हाल.’’

या बाबतीत एक फार चांगली म्हण इंग्रजीत आहे. या पुस्तकात ती नाही, पण आपणास त्याचा मराठी मथितार्थ सांगावासा वाटतो. ‘‘देव रोज एक ताजी सकाळ, जगण्याची एक नवी संधी आपल्या हाती देतो ती एक ‘भेट’ म्हणून. त्याचे तुम्ही ‘काय करता’ हे ‘तो’ बघत असतो. (म्हणजे सोने करावयाचे की ‘माती’ हे ज्याचे त्याने ठरवावे. खरे ना?)

तर असे हे जीवनाचे साधे, सोपे, सरळ सूत्र आहे.

‘आनंदयात्री’ जीवनी… आनंद वाटा चहुकडे
एकदा मिळते ही संधी… पडु दे सुगंधी पुण्यसडे’ खरे ना?

‘संस्कारदीप’ 2012 च्या दिवाळी अंकात आलेली गुरुनाथ तेंडुलकरांची ‘बायआजीच्या निमित्ताने’ ही कथा जीवनावर फार सुंदर भाष्य करते. लहानपणी ‘गावाकडे’ जायचे दिवस हे सौख्य आता अत्यल्प झाले आहे. मुले शहरातच व्हॉट्सऍप, ई चॅट यात रमतात. चित्रपट बघत वेळ काढतात. सुट्टीत मामाच्या, आजी-आजोबांच्या गावी जाण्याची परंपरा आता खंडित झाली आहे. पण गुरुनाथांना मात्र बाबांकडचे आजोळ तेंडुलीस आणि आईकडचे आजोळ खानोलीस जायची उत्तम संधी होती. या लेखातली हिरॉईन आहे बायआजी. नातवंडे घरी येणार म्हणून सर्व तऱहेचे आंबे करंडय़ात वेगवेगळे भरून ठेवणारी आईची सर्वात थोरली आत्या. रोज ते आंबे काढायची पसरायची नि सडलेले, अति पिकलेले आंबे बाहेर काढायची. त्यातला सडका भाग काढून उरलेला लिबलिबित आंबा पोरेटोरे खात. कधीही रसरसशीत आंबा पानात पडला नाही. यावरून गुरुनाथ एक फार सुंदर जीवनविषयक तत्त्वज्ञान वाचकांच्या पुढय़ात विचारार्थ मांडतात. त्यासाठी भर्तृहरींचा सुंदर दाखल देतात पहा –

‘संपत्ती तीन प्रकारे संपते. पहिला प्रकार – दान करून. दुसरा – उपभोग घेऊन नि तिसरा – सडून, नाश पावल्याने.’

याचाच अर्थ आजचा दिवस सोनेरी करा लोकहो! सर्व सोनेरी दिवस काळे करून येणाऱया दिवसांनाही काळे करण्याची चूक करू नका. मस्त राहा… मस्त जगा. उद्याच्या दिवसाची इतकी इतुकी चिंता नको की ‘आज’ नसेल. केवढा महत्त्वाचा सल्ला ना! मुंगीने कणाकणाने वारुळात साठविलेले धान्य नाग एका क्षणात वारुळावर हल्ला करून उद्ध्वस्त करतो. मधमाशीने मेहनतीने जमविलेला ‘मधुकण’ दुसराच कोणी पळवितो. आपल्या धनाचे तसे होऊ नये. दुसऱयाच कुणी त्यावर डल्ला मारू नये हीच इच्छा लेखक व्यक्त करतो.

‘मंगलाची प्रार्थना अन मंगलाचे गान हे
लेखकाचे शब्द सारे मंगलासी प्रार्थिताहे
झुळझुळू बघ वाहतो हा सद्विचारांचा झरा
भाव यातीत निर्मळाचा जाणवीतो हो खरा।’

वाचा! मनाची श्रीमंती वाढवाल. यातील ‘आनंदयात्रेस’ अनुभवा. सुखी व्हाल. खरेच सांगते. सद्विचार हे सुंदर अलंकारापेक्षा शोभिवंत असतात.

आनंदयात्रा
लेखक – गुरुनाथ तेंडुलकर
प्रकाशक – सुकृत प्रकाशन,
किंमत – 250 रु;  पृष्ठ – 174.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या