अस्वस्थ शहराचे यथार्थ चित्रण

>> अरविंद दोडे

‘मुक्तछंद’ हा काव्य प्रकार जगात सर्वाधिक प्रमाणात लिहिला जातो हे एकूण काव्याचा धांडोळा घेताना लक्षात येते. 1930 मध्ये कवी अनिल यांनी मराठीत प्रथम तो आणला असे म्हणतात. त्याचा स्वीकार करायला तत्कालीन कवी आणि समीक्षक यांनी फार खळखळ केली. ‘मुक्तछंद’ हा ‘बेबंद छंद’ आहे असे जाहीर करून विरोध केला. अर्थात वृत्तबद्ध कवितेच्या काळात नवा स्वच्छंद नाकारले जाणे स्वाभाविक होते. कालांतराने मुक्तछंद हा पहिला ‘बंधमुक्त’ छंद म्हणून पुढील साहित्य समृद्ध होत गेल्याचे दिसते. अर्थात परंपरेचा पदर धरून नवतेच्या नदीच्या प्रवाहात उतरणाऱयांमध्ये अनिलांचे विरोधकसुद्धा होते. आता तर हा छंद सर्रास बहुतेक संग्रहांत दिसून येतो. कवी, लेखक आणि चित्रकार रामदास खरे यांचा ‘आता अटळ आहे’ हा संग्रहसुद्धा याला अपवाद नाही.

आधुनिक विचारशैलीला साजेशी ही कविता आशयघन विचार मांडताना एका चिंतनीय मनाची सखोल अभ्यासवृत्ती प्रकर्षाने जाणवते, एकंदर शहरी जीवनाचा कालपट मांडते. ‘सूर्य येतो नि जातो / इमानी कारकुनासारखा’ अशी कवी दिवसाची सुरुवात व्यक्त करतो. अनेक संदर्भांचे जीर्ण कागद, शिल्पे आणि वेदनांसह चित्रविचित्र अनुभूतींचे चित्रण करतो. ‘आभाळाच्या कठडय़ापाशी / ढगांच्या गोठलेल्या दिशा’ त्यांच्या छाया बोलू लागतात. परस्पर आदानप्रदान केवळ विचारांचेच नाही तर रीतिरिवाजांचीही करतात.

पुस्तकांवर प्रेम करणारा कवी त्यांना माणसांप्रमाणे समजून घेतो. आपल्यातील अज्ञानाची वाळवी पुस्तकांना लागू नये म्हणून काय करावे हे सांगताना ‘आज वाचू, उद्या वाचू / नंतर वाचू, सध्या नकोच’ हे वागणे सार्वत्रिक असल्याने ‘पुढे हळूहळू / माणसं टाळू लागतात पुस्तकांना’ हे कटुसत्य कवी नोंदवतो.

निर्जीवांशी संवाद साधणाऱया कवितेची जातकुळी वेगळी आहे. संघर्ष आहे, पण तिरस्कार नाही, आदळआपट नाही, आक्रमकता नाही. सौम्य समजूतदारपणा आहे. म्हणून हा तळागाळाचे दर्शन न घडवताही मानवी हतबलता स्पष्ट करते. चिं. त्र्यं. खानोलकर यांचे शब्दचित्र रेखाटताना व्यक्त झालेली तळमळ हृदयस्पर्शी आहे. ‘तू हलकेच ओतलंस नक्षत्रांचं दान आमच्या झोळीत / पण… आम्हीच करंटे… आमचीच फाटकी झोळी’ ही कबुली महत्त्वाची आहे. काही अक्षरगंधर्व आपल्या ‘जीवनगौरव’ समारंभातून निसटतात या चुकीला क्षमा नाही.

‘मौनरंग’ विभागात कोरीव लेण्यांशी हितगुज करणारा कवी केवळ इतिहासप्रेमी नाही, तर अभ्यासक आहे. ‘करप्ट फाईल्सची निरीक्षणे’ या विभागात पृथ्वीवरील राजकीय, सामाजिक प्रदूषणाच्या अस्वस्थ नोंदी आहेत. कवी, कथाकार किरण येले यांची संग्रहाची उंची वाढविणारी प्रस्तावना वाचनीय असून आहे.

आता अटळ आहे
कवी – रामदास खरे
प्रकाशक – संवेदना प्रकाशन, पुणे
पृष्ठ – 96, मूल्य – रुपये 150/-

आपली प्रतिक्रिया द्या