>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक
गाडगेबाबा आयुष्यभर माणुसकीच्या आराधनेत रमले. आपल्या त्यागाने, प्रेमाने आणि सेवेने त्यांनी समाजातील दैन्य, दुःख घालविण्याचा कृतिशील प्रयत्न केला. थेट समाजाच्या अंगणापर्यंत ‘खराटा’ नेला. त्याच खराट्याने अंधश्रद्धेवर प्रहार केले, समाजाला स्वच्छतेच्या सूर्याचे दर्शन घडविले, श्रमप्रतिष्ठेचे बीजारोपण केले, आरोग्याचा संदेश दिला आणि व्यसनमुक्तीचा गजर केला. अशा या थोर महात्म्याचे पहिले चरित्र त्यांच्या हयातीत प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांनी लिहिले आहे, ‘श्री गाडगे महाराज मिशन’ (रजि.) नाशिक या बाबांच्या संस्थेने 17 मार्च 1952 ( एकनाथषष्ठी) रोजी प्रकाशित केले आहे. प्रबोधनकारांचे ज्येष्ठ चिरंजीव, प्रख्यात व्यंगचित्रकार, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या पुस्तकाचे रंगीत मुखपृष्ठ आपल्या अभिजात कुंचल्याने सुरेख रेखाटले असून ‘बाळ ठाकरे’ अशी त्यावर स्वाक्षरी केली आहे. आतील भागातही त्यांनीच रेखाटलेली गाडगेबाबांची सुरेख चित्रे आहेत. 108 पृष्ठांचे हे चरित्र छोटेखानी असले तरी ते लिहिताना ‘महाराष्ट्राचा नम्रसेवक केशव सीताराम ठाकरे’ असा स्वतःचा उल्लेख प्रबोधनकारांनी केला आहे.
या चरित्र लेखनामागची पार्श्वभूमी सांगताना ते लिहितात, ‘अवचित नि अयाचित योगाने गाडगेबाबांचे हे परमपवित्र सगुण चरित्र लिहिण्याची कामगिरी मजवर सोपवण्याची बाबांची लहर लागली. बाबांचे चरित्र महासागरासारखे अफाट नि विशाल हकिकतींचे, आठवणींचे नि भक्तजनांकडून आलेल्या नानाविध गोष्टींचे. कितीतरी कागदपत्रे माझ्यासमोर होती. किती घ्यावे नि कोणते टाकावे, समजेना. गांगरून गेलो मी! प्रथम तपशीलवार विस्तृत मोठे लिहिण्याची योजना. ते काम सावकाशीने चालले असतानाच, एक दिवस बाबांचा निरोप आला… ‘फुलवात तेवत आहे, तोवर तिच्या उजेडात काय पाहायचे ते पाहून घ्यावे. केव्हा वारा येईल नि ती विझेल याचा काय नेम? या निरोपाने मी तर चरकलोच. चला, मोठे नाही तर छोटे, पण माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वाचकांच्या विचारांना चालना देणारे पुस्तक शक्य तितक्या झटपट लिहून बाहेर कामासाठी बसलो टाईपरायटर खडाडवीत. बाबांच्या शतपैलू चरित्रातील मुख्य ठळक पैलू मी येथवर चित्रित केले. इंद्रधनुष्याप्रमाणे चित्ताकर्षक असणाऱ्या शेकडो नवलकथांचा समावेश करण्याचा मोह शिकस्तीने टाळावा लागला. एक तर लेखन मर्यादा आकुंचलेली आणि बाबांच्या निरोपातली ती ‘निरांजन’ मला सारखी वाकुल्या दाखवित सुटली. केली सेवा वाचकांनी गोड मानून घेतली. त्यातच मला आनंद.’
हे चरित्र लेखन समर्पित करतानाही त्यांनी गाडगेबाबांच्या स्वभावपैलूवर जाता जाता प्रकाश टाकला आहे. ते लिहितात, ‘अखेर गंगेच्या पाण्याने गंगेची पूजा, या न्यायाने ही चरित्र लेखनाची पत्री श्री गाडगेबाबांच्या चरणां – (अरे हो! पायांना तर ते हातही लावून देणार नाहीत.) बाबांच्या त्या कामधेनू गाडग्यात साष्टांग प्रणिपाताने समर्पण करीत आहे.’
घणाघाती, निर्भीड व रोखठोक लेखन करणारे महाराष्ट्रात जे थोडेफार लेखक होते, त्यापैकी एक प्रबोधनकार ठाकरे होते. मात्र दीनदलितांचा उद्धारक व निष्काम कर्मयोगी अशा गाडगेबाबांचे त्यांच्या हयातीत त्यांचे चरित्र लिहिताना मात्र त्यांनी आपला नम्र सेवाशील भाव व्यक्त केला आहे, हे विशेष!
ते लिहितात, ‘गरीबाची ही शिळीपाकी भाकरी-आमटी बाबांनी रूचकर मानून दिलेला समाधानाचा ढेकर कानी पडला म्हणजे आयुष्याचे सार्थक मानणारा… केशव सीताराम ठाकरे.’ या चरित्रात इ. स. 1952 पर्यंतच्या घटनांचा उल्लेख वैशिष्टय़पूर्ण शैलीने चितारला आहे. 1949 च्या दरम्यान दादर कॅडेल रोडवरील एका वाडीत झालेले गाडगेबाबांचे कीर्तन दूर बाजूला राहून प्रबोधनकारांनी ऐकले होते. यापेक्षा त्यांचा बाबांशी जास्त संबंध आला नव्हता. मात्र त्यांच्या क्रांतिकारक समाजवादी निष्काम चळवळीकडे त्यांचे लक्ष होते. त्यातून ते गाडगेबाबांचे चरित्र लिहिण्यासाठी तयार झाले. बुवाबाजी व दंभावर घणाघाती, धारदार लेखणी चालविणारे प्रबोधनकार ठाकरे हे गाडगेबाबांचे चरित्र लिहिताना मात्र तन्मय झाल्याचा प्रत्यय येतो.
लोकोत्तर, कर्मयोगी महात्म्याची जीवनकथा पारिजातकाच्या परिमळासारखी मातीलाही सुगंधी करते, असे मत या पुस्तकातील ‘देवडीवरचा मुजरा’ या त्यांच्या प्रस्तावनेत व्यक्त केले आहे. गाडगेबाबांचे हे पहिले चरित्र समाजशास्त्राच्या अभ्यासकांना निश्चितच उपयोगी पडेल, यात संदेह नाही.
(लेखक लोककला परंपरेचे अभ्यासक आहेत.)