हेमलकशाची अनवट वाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. विजया वाड

डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांचा सारा जीवनप्रवास सांगणारी प्रकाशवाट.

प्रकाश आणि मंदा आमटे ही बाबा आमटे-साधनाताई यांच्या पुढची पिढी. सेवेचा वारसा बाबांकडून उचललेली प्राणीमात्रांचं गोकुळ घरात असलेली. इतकी त्या प्राण्यांची सवय की नातवास ना सापाची भीती वाटत, ना जंगली श्वापदाची. भामरागड हेमलकसा परिसरातील आदिवासींची या दोघांवर केवढी गाढ श्रद्धा नि अतूट प्रेम.

‘प्रकाशवाटा’ हे डॉ. प्रकाश आमटे यांचे समकालीन प्रकाशनाने काढलेले आणि सीमा भान यांनी शब्दांकित केलेले एक अजोड, अप्रतिम पुस्तक – अर्पण पत्रिकेत प्रकाश आमटे काय लिहितात?

‘प्रकाशवाटा शोधण्याची प्रेरणा देणारे ताई आणि बाबा, सुरुवातीपासून पाठीशी भक्कमपणे उभं राहिलेलं आनंदवन, या कामासाठी स्वतःची सुस्थित आयुष्ये सोडून साथ देणारे कार्यकर्ते, माझं नि मंदाचं अवघं जीवनच बदलून टाकणारे आदिवासी या सर्वांना सादर-’

या पुस्तकाची 15 प्रकरणे म्हणजे या जोडीची वाटचाल आहे. पुस्तकाची सुरुवात अतिशय आनंददायी प्रसंगाने होते. 31 जुलै 2008 या दिवशी हेमलकशाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पावरचा’ फोन खणखणला. कोणती आनंदवार्ता सांगत होता तो फोन? सर आणि ताईंना मिळून ‘कम्युनिटी लीडरशिप’साठीचं त्या वर्षीचं रॅमंन मॅगसेसे पारितोषिक मिळाल्याची सुंदर बातमी सांगणारा फोन.

एवढी सुरेख बातमी की मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांचेही शुभसंदेश आले. पत्र, तारा, टेलिफोनवरील संदेश यांचा तर अक्षरशः मारा चालू होता. महत्त्व पैशाला होतं. 50 हजार डॉलर्स म्हणजे 20-22 लाख रुपये! प्रकल्पाला पैशांची गरज होती नि लोकबिरादरी प्रकल्प त्या पैशांच्या जोरावर सशक्त होणार होता. निबिड अरण्यात सुरू केलेला 1973 चा प्रकल्प उजेडात आल्याचं वाचून मनभर आनंद पसरतो. साधी, सोपी भाषा मन मोहवून टाकते आणि खरं सांगू का प्रिय वाचकांनो? हृदयाची भाषा कधीही अलंकारिक नसते. साधी, सोपी, सरळच असते. विकास आणि प्रकाश डॉक्टरी शिकताना एकाच तर वर्गात होते. मंदाशी ठरलेल्या विवाहाचे, जुळलेल्या प्रेमाचे वर्णन अत्यंत रोचक पद्धतीने करण्यात आले आहे. अहेर घ्यायचे नाहीत हे कसे लिहावे? त्याची सूचना विश्राम बेडेकरांनी कशी केली, ते मुळातून वाचण्यायोग्य आहे.

गोपाळ फडणीस, फिलिप जॉर्ज, विलास मनोहर या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांसोबतचे प्रकाश आमटे याचे जंगलातले छायाचित्र पाहून मन आपुलकीजन्य जिव्हाळय़ाने भरून येते. जंगलातला भाग म्हणजे हिंस्र श्वापदांचे नि जंगली प्राण्यांचे घर. तुम्ही तिथे राहणे हे अतिक्रमण नव्हे काय? अस्वले हल्ला करतायत, साप चावतायत तरी आदिवासी सेवेत खंड पडत नाही हे वाचून मन आश्चर्य मुग्ध होते.

पुरुषाकडे बायकांना कोणत्याही आजारासाठी दवाखान्यात न्यायचेच नाही! काय हा रिवाज! डॉक्टरसमोर कसली लाज? कुठला संकोच? बाई येणार ती फक्त बाळंतपणाला? प्रकाश आमटे लिहितात, झाडावरून पडून हाड मोडणे, खडा गिळणे, झाडांची काडी गिळून आतडय़ाला भोक पडणे, मोतिबिंदू न कळून कमी दिसणे, बाळंतपण, दातांच्या प्रचंड वेदना! काय अन् काय! अशा प्रकारे ‘हा डॉक्टर आपल्याला बरा करणार’ या विश्वासावर ते एक साधा डॉक्टर ते सर्जन, हाडरोगतज्ञ, डेंटिस्ट, स्त्र्ााrरोगतज्ञ – सगळंच झाले. कारण? पेशंटचा विश्वास! ही श्रद्धा! विंचू चावला की येथे बिना पैसा उपचार मिळतात म्हणून सदैव येथेच येणार हे लोक.

यातल्या काही पेशंटकथा तर इतक्या सुरस आणि चमत्कारिक आहेत की वाचून चकित व्हावे. शहरातून येथे भेटीला लोक येत नि सर्व तऱहेचे उपचार हा डॉक्टर नुसती पुस्तके वाचून करतोच कसा? म्हणून सरकार दरबारी तक्रार! घ्या… घेणे न देणे नि फुकट मनस्ताप सहन करणे! पत्नी मंदा मग गमतीने प्रकाशला चिडवे… ‘घे बक्षिस सेवेचे! लोक तुला डॉक्टर समजत नाहीत. तक्रार करतात. माझ्याबद्दल मात्र कोणाचीही तक्रार नाही!’

मित्रांनो, पैसा – अडका, दागदागिने, सुखसुविधा, वस्त्र्ाप्रावरणे, प्रसाधने, या कशाचाही सोस न करता पतीसोबत विनातक्रार जंगल निवास पत्करणे ही किती कठीण गोष्ट आहे याची कल्पनाच केलेली बरी! बरे ही तडजोड अल्प काळासाठी नाही. हेच आयुष्य! होईल कोणी उच्चशिक्षित महिला तयार? नुसतं वाचूनच मन थक्क होतं.

अशा अवघड आणि अनघड परिस्थितीत संसार चालू होता. 1984 मध्ये अनिकेत आणि आरती या दोन लहानग्यांसह पती-पत्नी भर पावसात कोर्टकेसला नागपूरला जाताना जीप रेतीत रुतली आणि बाहेर काढेपर्यंत 7 आणि 2 वर्षांची पिल्ले पाण्यात कशी शांत थांबली ते वाचले की वाटते…

प्रकाशभाऊंचे प्राणीप्रेम सर्वज्ञात आहे. सिंह असो वा बिबटय़ा… सारेच मित्र! कमालच ना? मोठी मोठी अस्वलं त्यांच्यापाशी सुतासारखी सरळ! घरातल्या लहान मुलांशीही प्रेमानं वागायची. ‘राणी’ या अस्वलाची अजब कथा मुलातल्या मुलालाही चकित करणारी आहे. दिगंतची साडेचार हजार फी (डॉक्टरीची) भरता येत नव्हती नि ती फी स्नेही सोहोनी आजींनी भरली हे वाचून डोळे वारंवार भरून येतात. डॉ. दिगंत नि डॉ. अनघा यांचा विवाह ही तर एक चित्तरकथाच आहे. प्रकल्पाचा वाढता पसारा अनिकेत सांभाळतोय तर दवाखाना डॉ. दिगंत! आरती ही कन्या प्रशिक्षित नर्स. प्रकल्पावरच काम करी. पण आता विवाहामुळे पुण्याला स्थायिक. जगावेगळय़ा कुटुंबाची ही जगावेगळी कहाणी. त्यांचे प्रत्यक्ष दर्शन ज्यांना झाले ते भाग्यवंत! पण पुस्तकातून तरी दर्शन घ्या रसिक वाचकांनो. न जाणो, वाचनाने मनाला समाजसेवेची एखादी हिरवी फांदी फुटेल! निदान मन तर समृद्ध होईल! हे ही नसे थोडके!…

प्रकाशवाटा

 लेखक –  डॉ. प्रकाश आमटे

 प्रकाशक – समकालीन प्रकाशन

 पृष्ठ – 155

 मूल्य – 200 रु.

– [email protected]