‘भिन्न’ ध्येयांची स्पर्धा

153

>> अरविंद दोडे

जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांचा समांतर जीवन प्रवास हा एक राजकीय इतिहासाचा आगळावेगळा पैलू आहे. अनेक गोष्टी अजून बाहेर आलेल्या नाहीत. पूर्वीच्या सत्ताधाऱयांनी ‘नेहरूसूक्ते’ गाण्यात धन्यता मानली आणि इतर दिग्गजांचे पराक्रम झाकून, दडपून ठेवले. सरदार पटेलादी देशभक्त नेते ‘गांधीगीते’च्या अध्यायांत झाकोळले गेले. सत्तापालट झाल्यावर आता एकेक प्रकरण अभ्यासक शोधून काढत आहेत. त्यांच्या संशोधनातून एकाच घराण्याची आणि एकाच पक्षाची अतिरेकी सत्ता किती घातक आणि दडपशाहीची होती हे नवनव्या ग्रंथ प्रकाशनांमुळे पुढे येऊ लागले आहे.

‘नेहरू व बोस’ हे पुस्तक अशाच गोतावळय़ातल्या तोंडवळय़ाचे आहे. दोघांचा जडणघडणीचा काळ पाहिला तर मोठा धकाधकीचा होता. दोघंही श्रीमंत घराण्यातले होते. दोघांचे शिक्षण केंब्रिजमध्ये झाले होते. दोघांनी राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला होता. 1920च्या आसपास दोघेही समविचारांनी एकत्र आले होते. दोघेही गांधीभक्त होते. 1930 नंतर त्यांची मैत्री तुटली. मतभेदामुळे मनाने एकमेकांपासून ते दूर गेले. कायमचे. 1910 पासून एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या या नेत्यांचा मानसिक संघर्ष खरोखरच कसा होता याचे उत्तर शोधताना अनेक पैलूंवर प्रकाश पडतो. दोघांची राजकीय, सामाजिक, वैचारिक भूमिका वेगवेगळी होती. मात्र महात्माजींपुढे नेहरू शरणागती दाखवत तर बोस हे विद्रोही विचार मांडत असत.

1920 मध्ये लोकमान्य टिळकांचे देहावसान झाल्यावर गांधी महात्मा म्हणून पुढे आले. त्यानंतरच्या घटना बहुतांशी काँग्रेस अधिवेशनाच्या संदर्भाशी संबंधित असल्या तरी  जहाल आणि मवाळ मतवादी यांच्यातील संघर्ष सतत वाढत गेल्याचे दिसते. लेखकाने अनेक सूक्ष्म तपशील देऊन पक्षात धुमसणारी आग तळातून पसरत असल्याचे दाखवून दिले आहे. चौथ्या प्रकरणात दोन स्त्र्ाया आणि दोन पुस्तकांबाबत ऊहापोह केलेला आहे. सुभाषबाबूंचे एक नाजूक प्रेमप्रकरण आणि लग्न या गोष्टीच्या आत दडलेल्या काही बाबी महत्त्वपूर्ण आहेत. 1934 मध्ये त्यांचे वडील स्वर्गवासी झाले आणि  एमिली शेंकल ही जर्मन सुंदरी भेटली. अशाच काही समांतर घटना नेहरूंच्या आयुष्यात घडल्या होत्या. 1919 मध्ये त्यांच्या पत्नीला कमलादेवींना क्षयरोगाबाबत माहिती समजली होती. 1935 मध्ये अखेरचा उपाय म्हणून त्यांना युरोपात न्यावे लागले. बर्लिनला (जर्मनी) नेल्यावर उपचार करण्यात आले. तो सारा काळ लेखकाने अत्यंत हृदयस्पर्शी भाषेत चितारला आहे. मोठय़ांच्या व्यथा-वेदनाही मोठय़ा असतात. नेहरू आणि बोस यांचा हा प्रवास समांतर आहे खरा, परंतु कुठेतरी, कधीतरी एकत्र झाला होता की नाही? या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष ग्रंथ वाचूनच मिळेल.

सुमारे पन्नास इंग्लिश संदर्भ ग्रंथ आणि असंख्य प्रकाशित – अप्रकाशित कागदपत्रे यांच्या अधिकृत आधारे सिद्ध झालेला हा ग्रंथ केवळ इतिहासग्रंथ आहे असे नाही, तर सुजाण वाचक, इतिहासप्रेमी राजकारणी, निष्ठावंत, समाजसेवक आणि शिक्षक, विद्यार्थी यांच्या मतांना, विचारांना नवी दिशा देणारा ग्रंथ आहे. अशा अनुवादाची सुरेख साखळी ‘रोहन’ टीमतर्फे यापुढे प्रकाशित होत राहो!

नेहरू व बोस : समांतर जीवन प्रवास
मूळ लेखक : रुद्रांग्शू मुखर्जी
अनुवाद : अवधूत डोंगरे
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे
पृष्ठ :  262, मूल्य : 350 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या