परीक्षण – व्यक्तिछटांचे तबक उद्यान

248

>> नीती मेहेंदळे

एक हुशार मेहनती संपादक असतो त्याची ही गोष्ट. त्याच्या 5 मुलांपैकी एक जण त्याला साहाय्य करायचं ठरवतो. तीर्थरुपांच्या करडय़ा शिस्तीत बोलणी खातो. वडिलांना कचेरीत इतर कर्मचाऱयांसारखा साहेब संबोधतो. होतकरू वयात अवचित वडिलांचा भक्कम आधार कोसळतो. तेव्हा मोजकी, वडिलांनी जपलेली नाती सवयीने पाठीशी उभी राहतात. हे मैत्र गाठीशी बाळगून आपलं पूर्ण आयुष्य तो बघता बघता प्रकाशनाला वाहून घेतो. आयुष्याच्या एका तृप्त टप्प्यापाशी (उतरण म्हणायचे नाही कारण ती नकारात्मकतेकडे नेते) त्यांना त्या सगळ्या आठवणी दाटून येणं साहजिक आहे. त्यांचं ऋण फेडणं तर दूरची बात व्यक्तही या व्यक्तींनी धड करू दिलं नसेल. हे पुस्तक ही त्या जिव्हाळ्याच्या बंधांचीच स्मरणिका म्हणू हवं तर.

आनंद अंतरकर हे स्वतः सिद्धहस्त लेखक आहेत हे त्यांच्या ’सेपिया’ या पुस्तकातून पदोपदी जाणवतंच. या पुस्तकात त्यांनी अवीट गोडीच्या या प्रत्येक नात्याविषयी अतिशय सुंदर प्रसंग तपशीलवार रेखाटले आहेत. त्यांची स्वतःची अशी लेखनशैली आहे. जी संस्कारी आहे. बहुश्रुत, व्यासंगी आहे आणि तिचा प्रत्यय पानोपानी येतो. प्रसंगी चित्रे सोबत जोडणं शक्यही असेल तरीही केवळ शब्दांतून डोळ्यासमोर व्यक्ती जिवंत उभी करणं हे कसब उत्तम व्यक्तिचित्रकाराचं लक्षण आहे. लेखांची शीर्षकं ‘हंस’चे संपादक का द्यायचे ते या पुस्तकातलं प्रत्येक शब्दचित्र वाचलं की समजते. लेखाचा आशय गोळा होऊन असा काही त्यात चपखल बसतो की आपल्याला तेच समर्पक वाटतं. ही लेखकाची खासियत दिसते.

लेखकाने संपादकीय व वैयक्तिक आयुष्य घडवण्यातल्या व्यक्तींमध्ये वडिलांना जसं काही एका केंद्रबिदूशी ठेवलंय. अखंड तेवत राहिलेल्या पणतीसारखं. आणि तिला फेर धरून त्याने एकेक व्यक्तिपुष्प त्यांत गुंफलंय. सगळी फुलं आवश्यक आणि आपली नेमकी जागा पकडून घट्ट विणली गेली आहेत. दुरून बघावं तर हे पुस्तक वाचून हातावेगळं करताना एखादं सुबक विविधरंगी फुलांचं देखणं तबक उद्यान वाटतं.

अरविंद गोखले हे मराठीत कथालेखन परंपरा यशस्वीरित्या पुढे नेण्यात व त्यात भरघोस गुंतवणूक करणारे नामवंत लेखक. प्रसिद्धी पराङ्मुख अशा या लेखकाचे भिडस्त मनाचे व्यवहार प्रस्तुत लेखक मित्र म्हणून कसे जपतात ते वाचनीय आहे. त्यांच्या शांत देखणेपणाचं त्यांच्या कथासरोवरात प्रतिबिंब पडलेलं आपल्याला आठवून जातं.

लेखकाची संगीताची जाण आणि कान, मारवा आणि रूपक या लेखशीर्षकातून जाणवते. थोर गीतकार, महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ओळखले गेलेले ग. दि. माडगूळकर यांचे जावई म्हणून लेखकाचा आलेला निकटसंबंध त्यांना चित्रपट आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रांत उदंड अनुभव देऊन गेला. त्यात संगीतकार सी. रामचंद्र यांच्याविषयी लिहिताना लेखक त्यांची अनेक गाणी मनात साठवत हळवा होतो. त्यांचा अल्प सहवासही त्यांच्या जीवनावर संस्मरणीय प्रभाव पाडून जातो.

पु. भा. भावे, बाळ गाडगीळ, म. द. हातकणंगलेकर, पु.वि. बेहेरे, राजेंद्र बनहट्टी अशा एकसे एक दिग्गज लेखकांच्या, साहित्यविश्वात त्यांनी करून ठेवलेल्या अजोड कामगिरीची आजच्या लेखक-वाचकांना अंतरकर नकळत ओळख करून देत आहेत. यात कोणी मितभाषी आहे कोणी प्रसिद्ध वक्ताच, कोणी संकोची भिडस्त तर कुणी विस्मरणशील. यातून घडलेले अनेक गमतीशीर, किस्से त्यांच्या कुशल लेखणीतून वाचणं हा संस्मरणीय अनुभव आहे.

भावेंचं मनस्वी ललित लेखन त्यांच्या संवेदनशील स्वभावातून उमटायचं याची लेखकाला तरुण वयात आलेली प्रचीती त्यांनी नमूद करून ठेवलीय. नीरक्षीरविवेकाने उत्तम ते टिपण्याची नोंद करून ठेवण्याची लेखकाची सवय ही सर्व आणि अनेक अलौकिक लेखकांची मांदियाळी जमवतच गेली. ते भावेंच्या भाषेतला केडन्स (नाद) समजून घेत. त्यांच्या लिखाणातले हावभाव, आवाजाच्या उतार चढावाच्या मागचा अभिनय जाणत असत! इतकं समजून घेणं याचीच दाद द्यावीशी वाटते व संपादकाच्या भूमिकेसाठी या गुणांचा पुढे त्यांना निश्चितच उपयोग झाला.

आनंद अंतरकर बहुश्रुत बहुवाचित आहेत. त्यांना लेखकांचे सूक्ष्म स्वभावविशेष टिपता येतात. त्यांनी काही इतक्या बारीक नोंदी ठेवल्या आहेत याचे राहून राहून आश्चर्य वाटते. त्यांच्या वाचनात आलेले उत्तम लेखनाचे नमुने ते अपरिहार्यतेने उद्धृत करतात ते इतके निवडक आणि वैशिष्टय़पूर्ण आहेत की त्यांचा इथे दाखला द्यायचा मोह होतो. त्यांची भाषा सालंकृत मराठी आहे. त्यामुळे वाचताना आजवर आपण फक्त ऐकलेल्या प्रसिद्ध व्यक्तींचं उत्कृष्ट भाववर्णन सरूप डोळ्यांसमोर उभं राहतं.
माणूस जन्मला की त्याचं स्वतःचं असं एक गुणसूत्र तयार होतं म्हणतात. पण तो जसा मानसिक व शारीरिक वाढत राहतो त्याला इतरही गुणसूत्रांमधले गुणदोष येऊन चिकटत राहतात. त्यांनी तो अधिकाधिक समृद्ध होत राहतो. या पुस्तकाच्या निमित्ताने ही अननुभूत प्रचीती मला आली. खरं तर ही सगळी माणसं ज्यांना ते भेटले, ज्यांचा सहवास घडला ती प्रत्येकी स्वतंत्र बेटं आहेत. त्यांच्यावर काही काळ राहता आलं, सौहार्दाचे जे क्षण लेखकाला लाभले त्याचं तितक्याच साजऱया शब्दांनी गच्च भरलेलं हे ऋण ते आपल्या साक्षीने ओंजळीतून फेडत आहेत,असं काहीसं माझं प्रांजळ मत.

आपली प्रतिक्रिया द्या