पुराणातली अर्थपूर्ण वांगी

550

>> डॉ. विजया वाड

बुद्धीवादी, स्त्रीवादी लेखिका सुधा मूर्ती. त्यांच्या ओघवत्या लेखणीतून जशी डॉलर बहु साकारली तशाच पुराणकथाही सजीव होऊन उतरतात.

सुधा मूर्ती या विख्यात समाजकार्यकर्त्या आहेत. तितक्याच वाचकांच्या हृदयास हात घालणाऱया कथालेखिकाही आहेत. जवळजवळ तेरा भाषांमध्ये त्यांची पुस्तके भाषांतरित झाली आहेत. ‘गरुड जन्माची कथा’ हा कथासंग्रह ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तीच्या कथा घेऊन वाचकांपुढे आला आहे. मुखपृष्ठ लक्षवेधी आहे आणि लीना सोहोनी यांचा अनुवाद ओघवता आहे. सुधा मूर्ती यांनी या कथासंग्रहात ब्रह्मा, विष्णू, महेशांवरील रूप-स्वरूपांवर कथा लिहिल्या आहेत. काय आहे, आपल्या पुराणाविषयी उमलत्या पिढीत उदासीनता जाणवते. त्यांना आपल्या ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तींबद्दल आणि सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पत्नींबद्दल नावापलीकडे माहितीही नाही की गोष्ट सत्य आहे. म्हणून या कथा संग्रहाचे महत्त्व! जरूर वाचा तरुण वाचकांनो!

हिंदुस्थानी पुराणांविषयी सुधा मूर्ती यांनी जी मालिका लिहायला घेतली त्यातला हा दुसरा (हिंदुस्थानी पुराणांविषयीचा) भाग. कश्यप ऋषींना दोन पत्नी होत्या. एक विनता आणि दुसरी कद्रू. एक दिवस कश्यप ऋषी त्या दोघींना म्हणाले, ‘‘मी तुम्हा दोघींना एक एक वरदान देऊ इच्छितो. तुम्ही आपापली इच्छा सांगावी.’’ कद्रू म्हणाली, ‘‘मला एक हजार पुत्र हवेत.’’ ऋषिवर्यांनी होकार दिला. कश्यपांनी मग दुसरी पत्नी विनता हिला विचारले, तुझी इच्छा? ती म्हणाली, ‘‘पतिदेव, मला फक्त दोनच पुत्र हवेत, पण ते कद्रूच्या सर्व पुत्रांपेक्षा शक्तिशाली असावेत. (ये हुई ना बात! असो-) तिलाही त्यांनी ‘तथास्तु’ म्हटले. काही दिवसांनी कद्रू आणि विनता दोघींनी अंडी घातली (अंडी? हो हो अंडी. हा पुराणकथेचा भाग आहे) कद्रूची अंडी लवकर उबली आणि त्यातून नागाची पिल्ले बाहेर पडली. पृथ्वीवरील नागांच्या जातीचा उदय. मग अनेक चमत्कृतीपूर्ण घटना घडतात. त्या अत्यंत वाचनीय आहेत.

‘अरुण’चा जन्म विनताच्या अंडय़ातून कसा झाला, तो सूर्यदेवाच्या रथाचा सारथी कसा झाला, ‘अरुणोदय’ हे नाव भाषेत कसे आले, त्याला पाय का नव्हते…सारे कथन कथेत रंजकपणे आले आहे. शेवटचे अंडे कालांतराने एकदाचे फुटले त्यातून एक मानव बाहेर आला. त्याला पक्ष्याचा चेहरा होता. बळकट पंख होते. तो आईस म्हणाला, ‘‘मी बलाढय़ गरुड आहे. मी भगवान विष्णूंचे वाहन होणार आहे.’’ या दोघी बहिणींच्या पैजेचे नि हरल्यास एकीवर गुलामीचे संकट येण्याचे उपकथानक फारच रसभरे आहे. गुलामी विनतास भोगावी लागते, पण गरुड आईस मुक्त करतो अशी ही पुस्तकाची शीर्ष कथा.

या पुस्तकातील कथा छोटय़ा छोटय़ा असल्या तरी पुराणकथेचे अज्ञात दालन उघडणाऱया, कुतूहल जागृत करणाऱया, देवदेवतांच्या-पर्यायाने शक्ती नि सामर्थ्याच्या जगात घेऊन जाणाऱया आहेत. या पुस्तकातील चंद्र आणि पर्ण, अर्धनारीनटेश्वर, ब्रह्मदेवाची चूक, समुद्रमंथन या कथा वाचकांचे मन रिझवतील. यातील ‘प्रामाणिक भामटा’ ही कथा तुमचे मन रिझवील बघा. याचं असं झालं, एक दिवस इंद्रदेव शंकराला भेटायला कैलास पर्वतावर गेले. तिथे एक माणूस ध्यानमग्न अवस्थेत बसला होता. शंकर महादेवांच्या गणांपैकीच एक असेल असं वाटून इंद्रदेवाने विचारले, ‘‘धनी कुठे भेटतील तुझे?’’ अनेक वेळा विचारलं तरी तो आपला ध्यानमग्नच. मग देवाधिदेव इंद्र रागावले हो! इंद्राचं अस्त्र वज्र. तेच उपसलं नि परजलं की! पण शंकर भगवानांनी आपलं मूळ रूप धारण केलं नि इंद्राच्या दिशेनं एक बाण सोडला. साक्षात शंकरास पाहून इंद्रदेवांची पाचावर धारणच बसली. त्याने चक्क शंकर महादेवांचे पाय धरले की! शंकराने इंद्राच्या दिशेने सोडलेला बाण सागराच्या दिशेने वळवला. तो बाण समुद्रात पडला. पाण्याचा स्पर्श होताच बाणाचे बाळ झाले. सागर राजाने ब्रह्मदेवास म्हटले, ‘‘याचे नामकरण करा!’ तोच जलंधर! शंकराच्या बाणापासून जन्मलेला सदाचरणी, सतशील राजा बनला तो. समुद्र मंथनात ‘मोहिनी’चे रूप घेऊन विष्णूने असुरांना कसे फसविले, अमृतकुंभ कसा हस्तगत केला ही हकीकत असुरांनी त्याला सांगितली तसा तो संतप्त झाला नि देवाचा सूड घेण्याच्या भावनेने पेटून उठला. इंद्राशी लढला. इंद्राने घाबरून पलायनच केले. इतके जलंधराचे शौर्य! त्याची पत्नी वृंदा भगवान विष्णूची महान भक्त होती. ती जलंधराच्या प्राणांचे भक्तिसामर्थ्याने रक्षण करी. सतत. पण जलंधराला आता इतका गर्व झाला की तो पत्नीचेही ऐकेना. साक्षात श्री विष्णूंशी लढाई करायला निघाला ! पण पत्नी विष्णूभक्त ना! मग देवाने युक्ती वापरली. युद्ध तुझ्याशी अशक्य नाही, पण तू तर सागरपुत्र, माझी पत्नी लक्ष्मी तीही सागरकन्या, तू बंधू सखा अन् मित्र! पत्नीच्या भावाशी कसा करू युद्ध सांग तू? नाते मेहुण्याचे।’ …अशी बतावणी!

जलंधर हे बोलणे ऐकून अवाक झाला. पत्नी याची बहीण आपुली? कसे करावे युद्ध? त्याने म्हटले, ‘तुम्ही दोघे अक्षय्य सुखात राहा.’ मग शंकराशी युद्ध पुकारले! आता कसे याला वाचवावे? विष्णू देव विचारात पडले. शंकरही त्याच्यावर पित्यासारखे प्रेम करीत होता. पत्नीचा देव विष्णू नि शंकरपुत्र जलंधर कसे मारू? विष्णूने नाईलाजाने जलंधरास मारले. काय करणार? गर्वभार उतरेना ना! पतिव्रतेला दुःख! मग त्यांनी जलंधराचे रूप धारण केले. वृंदाला ते समजताच तिने प्रत्यक्ष देवाधिदेवास शाप दिला. शिळा होण्याचा. रसिक वाचकांनो, श्रीविष्णू नि शंकर एकच हो! आपण ज्या शिवलिंगाची पूजा करतो तो पतिव्रतेच्या साधनेचा… सामर्थ्याचा… परिपाक बरं!

‘इन्फोसिस’ची निर्मिती करण्यात नारायण मूर्तींना बरोबरीने सहकार्य करणारी ही समर्थ, बुद्धिमान, तेजस्वी नि खूप खरी स्त्री, कथाविश्वातही तितकीच हवीहवीशी वाटावी, हे तिचे, आपले सर्वांचे भाग्य आहे. कथा विश्वात पुराणकथांचे नवे दालन उघडून त्यांनी एक नवा आयाम दिलाय. मराठी सारस्वत हे जगातल्या वाङ्मयातले मोठे समृद्ध दालन आहे. त्यात ही मोलाची भर! ‘The Man from the Egg’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे.

गरुड जन्माची कथा
लेखिका – सुधा मूर्ती
अनुवाद – लीना सोहोनी,
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस,
पृष्ठ – 154. किंमत – रु. 180.

आपली प्रतिक्रिया द्या