प्रतिभावंतांचा जीवन संघर्ष

302

>> डॉ. शशिकांत लोखंडे

इंटरनेट-गुगलमुळे आता खूप गोष्टी विनासायास ज्ञात होतात. साहित्य आणि विविध कलाक्षेत्रांतील प्रतिभावंतांचे जीवन व त्यांची साद्यंत माहिती फारशी अप्राप्य नाही. सामान्य माणसांपेक्षा किंवा सामान्य माणसांप्रमाणे ही मंडळी कशी जगली… वाढली… संपली यासंबंधीचे कुतूहलही आता दूरस्थ नाही. आयती माहिती महाजाला वरून मिळत असली तरीही काही प्रतिभावंतांच्या जीवनाचे विविध पैलू अद्याप अज्ञात आहेत आणि त्यासाठी लिखित चरित्रांची उभारणी करावी लागते. अशा अज्ञात पैलूंच्या शोधासाठी चित्रकार सतीश भावसार यांनी ‘तीन चित्रकार’ नामक छोटेखानी एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी व्हिन्सेंट व्हॅन गॉग, अमृता शेर-गिल आणि प्रभाकर नाईक-साटम यांच्या जीवनलक्षी कलेविषयी अतिशय मार्मिकपणे लिहिले आहे. 18व्या शतकात व्हॅन गॉग, 19व्या शतकात अमृता शेर-गिल आणि 20व्या शतकात प्रभाकर साटम गाजले.

व्हॅन गॉगनं आत्महत्या केली ही बाब अद्याप कारणदृष्टय़ा गूढ आहे. त्याच्या आयुष्यात अनेक स्त्रिया येऊनही त्याला कुठेच प्रेम-प्रतिसाद मिळाला नाही. या सर्व स्त्र्ायांचा जैविक तपशील पुस्तकात भावसार यांनी एकत्रपणे दिला आहे. अमृताने 28 वर्षांच्या आयुष्यात अनेक चित्रं काढली. परंतु तिच्या वैवाहिक जीवनाचे चित्र रंगविहीन राहिले. तिने पॅरिसचा कलाप्रवाह हिंदुस्थानात आणून रुजविला. प्रभाकर नाईक साटम या कोकणी कलावंताने जपानमध्ये जाऊन लक्षवेधी टेपेस्ट्रीज बनवल्या व जपानला एक नवा चेहरा दिला. त्यांनी विवाहही एका जपानी स्त्र्ााrशी केला व कलेबरोबर जीवनसंसारही न बिघडवता सांभाळला. पूर्वी हे लेखन भावसाराचं ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकात येऊन गेले होते. हे तीनही चित्रकार मनस्वी आहेत. नातेसंबंधांच्या आणि प्रेमप्रकरणांच्या व्यूहात ते पुरते अडकून फसले आहेत. स्वतःवर गोळी झाडून व्हॅन गॉग 37व्या वर्षी मरण पावतो. त्याची व त्याच्या भावाची समाधी एकाच नामनिर्देशाने कोरलेली आहे. व्हिन्सेंट मनोरुग्ण होता. ‘‘त्याच्या मनातली काळय़ा पोशाखातील बाई, युजेनची आई आणि व्हिन्सेंट यांच्यातल्या प्रेमाचा दिखाऊपणा आणि युजेनवरचं त्याचं प्रेम, हॅनसिक कुटुंबातली कॅरोलिन, क्लासिना म्हणजे हुर्निक या वेश्येबद्दल त्याला वाटलेल्या माणुसकीपेक्षा सहानुभूतीनेच व्हिन्सेंट घडला का?’’ (पृ. तेरा). त्याचं ‘सॉरी’ हे चित्र तिच्या जीवन संघर्षाचं प्रतीक आहे. सीएन, मार्गोट, ऍगोस्तिना सेगा तोरी, गार्डिना अशा अप्राप्य स्त्र्ायांनी त्याच्या चित्र निर्माणाला प्रेरणा दिल्या.

शेर-गिलची सौंदर्य आणि सेक्सवरील न्यूड मॉडेलची चित्रे गाजली. तिचं परदेशातलं जीवन, हिंदुस्थानातलं जीवन, अंजठा-वेरूळचा तिच्यावरील प्रभाव, तिचे मित्र, तिचा नवरा, तिचं गरोदरपण, तिचा लैंगिक आजार या अवघड वळणांचं दर्शन सतीश भावसार यांनी शब्दांच्या रेषांतून अचूक चितारलं आहे. कलात्म अंतर्गत सुसंगीत शेर-गिल आणि व्हॅन गॉगमध्ये कशी आहे याचेही दर्शन भावसारांनी घडविले आहे. दुःख, वेदना, संघर्ष हा अमृता व गॉगमधील समान दुवा आहे. अमृताचा शेवटही रहस्यमय आहे.

याबरोबर जपानमधील जगातल्या मोठय़ा म्युझियममध्ये प्रभाकर नाईक साटम यांनी ‘लाइफ आफ्टर डार्क’ या टेपेस्ट्रीने चमत्कार घडविला. बांदिवडे (कणकवलीतील) गावच्या प्रभाकरने प्रत्यक्ष जीवनात चांभारकडे करून स्वतःला घडवलं, त्याचा आलेख सुंदर पद्धतीने ‘तीन चित्रकार’मध्ये आहे.

‘तीन चित्रकारांच्या कलात्मक आणि वैयक्तिक आयुष्याला केलेला स्पर्श’ ‘तीन चित्रकार’मध्ये आहे. (पृष्ठ 16) भिन्न संस्कृतीत रुजलेले हे चित्रकार प्रतिभावंत म्हणजे ‘पाश्चात्त्य आधुनिकता आणि पौर्वात्य परंपरा यांचा समतोलच’ म्हटला पाहिजे असे दीपक घारे यासंदर्भात म्हणतात, त्याचा प्रत्यय येतो. सांस्कृतिक अभिसरणाचे सुंदर चरित्र म्हणजे भावसारांचं हे पुस्तक होय. व्हॅन गॉगच्या चित्रातली अस्वस्थता स्त्र्ायांसंबंधींचे क्लेश याबाबत आहे. मुक्त आयुष्य जगताना अमृताही दुःख, वेदनेच्या ज्वालांनी कशी होरपळली या पार्श्वभूमीवर व्यक्तिगत जीवन संघर्षामधून बाहेर पडून जागतिक कीर्ती मिळवणारे प्रभाकर खरंच प्रेरणादायी ठरतात.

कलावंत-प्रतिभावंत यांच्या व्यामिश्र जीवनशैलीचा शोध-उलगडा करणं हे सोपं काम नाही. भावसारांसारखे संवेदनशील चित्रकारच हे काम हाती घेऊ शकतात. तथापि व्हॅन गॉगने आपला कान का कापला, शेर-गिलने पुनर्विवाह का केला या काही प्रश्नांची उत्तरे ‘तीन चित्रकार’मध्ये नसली तरीही हे पुस्तक अन्य जीवनशोधामुळे समाधान देते हे विशेष होय… सर्वांनी ‘तीन चित्रकार’ वाचावं असेच हे लेखन आहे.

‘तीन चित्रकार’
लेखक : सतीश भावसार
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
पृष्ठ : 144 मूल्य : 200 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या