फाळणीच्या व्यथा

240

>> डॉ. विजया वाड

गुलजार यांनी सिनेरसिकांच्या दिलावर अनेकानेक वर्षे राज्य केले आहे. त्यांची काव्यात्म शैली, त्यांची शब्दरचना, आशय सुंदरतेने मांडण्याचे कौशल्य मनास भुरळ घालते. ‘रावीपार’ हा त्यांचा कथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने काढला आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे देखणे मुखपृष्ठ या कथासंग्रहास लाभले आहे. गुलजारांना शायरी लिहिणे अधिक भावते, कारण त्याला रसिकांची भरभरून दाद लाभते. ‘शेर’ छोटे नि ‘दाद’ मोठी! वारंवार मिळणारी. कथेचे तसे होत नाही. कथाकथनाला मधेमधे दाद मिळत नाही ना! तरीही कथेची नशा वेगळीच नि महिनोन महिने न उतरणारी असते, हे मात्र खरे!

या संग्रहातील प्रत्येक कथा सुंदरतेचा साज लेवून आली आहे. विजय पाडळकर आणि मोहन वेल्हाळ यांनी मराठीत या कथांचा अनुवाद केलाय. अतिशय सुंदर अनुवाद! गुलजार जेव्हा कथा लिहितात तेव्हा त्यांना अपारंपारिकतेचा साज चढवितात. भाषाशैलीही नेहमीची वळणे न घेता ‘रावीपार’ जाते. ‘रावीपार’ ही फाळणीच्या वेळची एक अलौकिक कथा आहे. दर्शनसिंग या कथेचा नायक आहे. बाप अपघाताने मरण पावला आहे. आई भग्न-विष्णण्ण-दुभंग अवस्थेत गुरुद्वारात हरवली आहे आणि अशा अवस्थेत पत्नीने जुळय़ा मुलांना जन्म दिलाय!

असेच म्हणावेसे वाटते ही गोष्ट वाचून. दर्शनसिंग हा फाळणीतील दुःखाचे प्रतिरूप आहे. बेघर झालेल्या लोकांच्या दुःखाचा हुंकार. प्रत्येक जण गुरुद्वाराकडे आश्रयासाठी धावतोय. गुरुद्वाराच्या बाजूने ‘बोले सो निहाल’ ऐकू येत आहे. भापाजी (दर्शनसिंगचे पिताश्री) कसला आवाज म्हणून बघायला छतावर गेले ते परतताना पायऱयांवरून घसरले आणि सरळ पडले ते अंगणातल्या कुदळीवरच. तिचं पातं मस्तकात घुसलं… नि.. अंत! दर्शनसिंग मग गुरुद्वारात!
सरकार काही मदत करील ही आशा! कुणाचं सरकार हो पण? ब्रिटिश निघून गेलेयत. पाकिस्तानचं सरकार अजून बनलेलं नाही. नियंत्रण रेषेकडे.. रेषेपलीकडे निर्वासित चाललेत. गुरुनानकांचे स्मरण करीत दर्शनसिंगही निघाला हिंदुस्थानकडे. बरोबर आई नाही. तिचा ठाम नकार मी नंतर येईन… म्हणून त्या गुरुद्वारातच हरवली. बायको ओली बाळंतीण! ती नवऱ्यासोबत न येऊन कोणाला सांगते? रेलगाडी खचाखच भरलेली. दर्शनसिंग, पत्नी शाहनी नि तो दोन कोवळी अर्भकं. एका टोपलीत घातलेली मळक्या कपडय़ात गुंडाळलेली. पैकी पाहणी करता एकाचं अंग बिलकूल थंड पडलेलं. शाहनी मात्र टोपलीला कवटाळून!

खैराबाद गेलं? एका तासात हिंदुस्थान? रावी नदी आली? ‘ते मेलेलं मूल रावीत टाका!’ रावीपार जाण्याआधी ते कृत्य दर्शनसिंग करतो नि हवेत रडण्याचा हुंकार. बाप रे बाप! मेलेलं मूल पत्नीच्या कुशीत? दुःखाची परिसीमा छातीत दाटलीय नि गाडी? ती आनंद सीमेवर हिंदुस्थानात, रावीपार, पोहोचली आहे.
ही अजरामर कथा मराठीत आली हे मराठी वाचकांचे भाग्य. छोटी छोटी वाक्ये, पण काळजाला भेदून जाणारा आशय! गुलजारांच्या ‘रावीपार’मधली हीच ती कथा. जिने ‘टायटल’चा मान घेतला आहे.

‘पीक’ ही दानीरामची कथा वाचून आपण सारेच आतून हालून जाल. सरकारी शेतकरी जुलूम, अत्याचार मान तुकवून सहन का करतात? ठाकूर एकटा मोत्याचा घास खाणार आणि पिकं निर्माण करणारे जिवंत मरण भोगणार? ऐशा अन्यायाच्या पार्श्वभूमीची ही कथा अंतःकरणातील दुःखाची जागा ‘भडक्या’ने घेते. गाडीत विनातिकीट प्रवास करणारा दानीराम नि त्याला गुंड-दरोडेखोरांनी दिलेला माणुसकीचा, प्रेमाचा, ओलाव्याचा बटाटय़ाचा पराठा। जोडीला कांदाही. सरदार दानसिंहाची मित्रतापूर्ण, माणुसकीने भरलेली कृती. आपण सारे वाचूनच थक्क व्हावे अशा या कथाकृती! ते नेहमीचे सासू-सुनेचे गुळगुळीत जीवन पार करून आपल्याला वेगळय़ाच जगात घेऊन जाणाऱया. हे पुस्तक गुलजारांनी राखीला अर्पण केलेय.
‘राखी, तुझ्याचसाठी’ या शब्दात.
आंतरराष्ट्रीय कीर्ती गुलजारांनी संपादन केली आहे. कवी म्हणून, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून. त्यांचा हा पहिलाच कथासंग्रह. खरे तर लघुकथांचे महत्तम रूप असलेला.
‘कधी गुलजार, कधी कधी सुखदुःखाच्या पार
अंतःकरणे छेदित आरपार, कथेला नूतन आकार’
असा हा लघुकथा संग्रह, तुम्हा सर्व रसिकांचे मने जिंकून घेईल यात मला तीळमात्र’ शंका वाटत नाही. गुलजारांची संवेदनशील लेखणी मन कधी हळवे करते नि कधी कणखर भूमिका घेणारा सामान्य माणूस बघून आपल्याही मनास उभारी येते. अवश्य वाच रसिका… ‘रावीपार’.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या