हेडने वाढवली हिंदुस्थानची डोकेदुखी; हेडने ठोकले सलग दुसरे शतक

ट्रव्हिस हेडने हिंदुस्थानची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढवली. गेल्या कसोटीत 140 धावांची झंझावाती खेळी करणाऱया हेडने गॅबावर 152 धावांची घणाघाती खेळी करत ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 407 अशी दमदार मजल मारून दिली. हेडच्या साथीने स्टीव्हन स्मिथनेही आपला हरवलेला शतकी सूर शोधला आणि ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावाला बळकटी मिळवून दिली.

शनिवारी बिनबाद 28 अशा स्थितीत असताना पावसाचे आगमन झाले आणि सामना पुन्हा सुरूच होऊ शकला नाही. शनिवारी फक्त 13.2 षटकांचाच खेळ होऊ शकला होता, मात्र आज पावसाच्या कृषादृष्टीमुळे पूर्ण दिवसाचा खेळ होऊ शकला आणि ऑस्ट्रेलियाने आज हेड आणि स्मिथच्या शतकांच्या जोरावर 377 धावा काढल्या.

मालिकेत 1-1 अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थान असल्यामुळे आघाडी घेण्याचे ध्येय बाळगून उभय संघ शनिवारीच मैदानात उतरले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला दिवस वाया गेला, मात्र आज खेळ सुरू झाला आणि ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानच्या नाणेफेकीच्या निर्णयाला चोपून काढले. जसप्रीत बुमराने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला 5 हादरे दिले. मात्र अन्य गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गुंडाळण्यात अपयश आले.

बुमराची भेदक सुरुवात

जसप्रीत बुमराने पुन्हा एकदा हिंदुस्थानी संघाला खणखणीत सुरुवात करून दिली. त्याने आज आपल्या दुसऱ्याच षटकात उस्मान ख्वाजाला (21) बाद केले आणि त्यानंतर पुढच्याच षटकात नॅथन मॅकस्विनीला (9) बाद करत सनसनाटी निर्माण केली. फलकावर 38 धावा लागल्या होत्या आणि ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी तंबूत परतल्यामुळे हिंदुस्थानी संघात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. स्टीव्हन स्मिथ आणि मार्नस लाबुशनने काही काळ किल्ला लढवला, पण लाबुशनला (12) नितीश रेड्डीने बाद करत ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. मात्र यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि ट्रव्हिस हेड यांनी ऑस्ट्रेलियन डावाला मजबुती दिली आणि पूर्ण दिवस ऑस्ट्रेलियाच्या बाजूने वळवला.

‘हेड-स्मिथ’चा हिंदुस्थानी संघाविरुद्ध हल्ला

ट्रव्हिस हेडची बॅट पुन्हा एकदा हिंदुस्थानी गोलंदाजीविरुद्ध तळपली. गेल्या दोन डावांत त्याने 89 आणि 140 अशा वेगवान खेळय़ा करत ऑस्ट्रेलियाला सावरले आहे. आज त्याने तीच भूमिका करताना हिंदुस्थानची गोलंदाजी पह्डून काढली. त्याने सर्वप्रथम स्मिथसह चौथ्या विकेटसाठी 241 धावांची भागी रचत ऑस्ट्रेलियाचे दिवसावर वर्चस्व निर्माण केले. हेडने सलग दुसरे शतक ठोकताना फक्त 115 चेंडूंची मदत घेतली. त्याने यात 13 चौकार लगावले. हे हेडचे नववे कसोटी शतक होय. त्याच्यापाठोपाठ स्मिथनेही तब्बल 17 महिन्यांनी आपले पहिले आणि कारकीर्दीतील 33 वे कसोटी शतक पूर्ण केले. संघाची मजल 300 पार गेल्यानंतर ही जोडी फुटली. बुमरानेच हिंदुस्थानला हे यश मिळवू दिले.

बुमराची पुन्हा सनसनाटी

स्मिथ आणि हेडची जोडी फुटता फुटत नव्हती. दोघांनीही हिंदुस्थानी गोलंदाजांच्या अक्षरशः नाकात दम आणला होता. तब्बल 50 षटके या दोघांनी खेळून काढल्यानंतर बुमराने या जोडीचा मजबूत जोड तोडू काढला. त्याने आधी स्मिथचा शतकी खेळ संपवला. या विकेटने संघात पुन्हा जोश दिसू लागला. मग एका षटकानंतर त्याने मिचेल मार्शचा (5) काटा काढला आणि मग तीन चेंडूंनंतर ट्रव्हिस हेडची डोकेदुखी 152 धावांवर संपवली. 3 बाद 316 अशा भक्कम स्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाची 6 बाद 327 अशी अवस्था करत बुमराने हिंदुस्थानला सामन्यात आणले. बुमराने बाराव्यांदा डावात 5 विकेट टिपण्याची किमया साधली, पण त्याच्या गोलंदाजीला पुन्हा एकदा अन्य कुणाचीही साथ लाभली नाही. 11 धावांत 3 फलंदाज बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया काहीशी अडचणीत आली होती. याक्षणी हिंदुस्थानला त्यांचा डाव संपविण्याची संधी होती, पण हिंदुस्थानी गोलंदाजांना त्या संधीचे सोने करता आले नाही. पुढे अॅलेक्स पॅरीने पॅट कमिन्सच्या साथीने 48 धावांची भागी रचत ऑस्ट्रेलियाला 400 समीप नेले. दिवसाचा खेळ संपता संपता सिराजने पॅट कमिन्सची विकेट काढली, पण पॅरी मैदानात तळ ठोकून होता.