पुतीन यांनी क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी दिली होती, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आपल्याला क्षेपणास्त्र हल्ल्याची धमकी दिल्याचा दावा केला आहे. व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवरील हल्ल्याच्या आधी माझ्यावर मिसाईल हल्ला करण्याची धमकी दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट जॉन्सन यांनी केला आहे.

बीबीसीवर प्रसारित झालेल्या‘पुतिन वर्सेस द वेस्ट’या माहितीपटात हा दावा करण्यात आला आहे. या माहितीपटानुसार, 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याच्या एक दिवस आधी व्लादिमीर पुतिन यांनी जॉन्सन यांना फोन केला होता आणि त्यांना मिसाईल हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

जॉन्सन म्हणाले की, त्यांनी मला एक प्रकारे धमकी दिली, पुतिन म्हणाले की, बोरिस मला तुमचं नुकसान करायचं नाही, परंतु मिसाईल (क्षेपणास्त्र) हल्ल्याने असं करायला मला केवळ एक मिनिट लागेल. जॉन्सन आणि इतर पाश्चिमात्य देशांमधील नेते युक्रेनला समर्थन दर्शवत आहेत. तसेच रशियाचे हल्ले रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. जॉन्सन हे युक्रेनचे राष्ट्रपती वोलदोमीर झेलेन्स्की यांचे समर्थक आहेत.

या माहितीपटात बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं की, युक्रेनवरील हल्ल्याच्या आधी मी पुतिन यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. युक्रेन नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाही, असंही मी पुतिन यांना सांगितलं होतं, असं जॉन्सन यांनी यावेळी सांगितलं.