बोरिवलीत पालिकेचे 150 खाटांचे अद्ययावत रुग्णालय

बोरिवलीत अद्ययावत आरोग्य सुविधा असलेले 150 खाटांचे पालिकेचे रुग्णालय लवकरच सुरू होणार आहे. बोरिवली( पूर्व) येथील पालिकेच्या या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या नवीन इमारतीची पाहणी करून तातडीने सेवा सुरू करण्याचे निर्देश आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले. या रुग्णालयात मेडिसिन, बालरोग्यशास्त्र, शस्त्रक्रिया, नेत्ररोगशास्त्र आदी विभाग राहणार आहेत.

पालिकेचे हे रुग्णालय बोरिवली परिसरातील नागरिकांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. त्यामुळे या ठिकाणची प्रलंबित कामे ताबडतोब पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱयांना दिले. रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱया डॉक्टर क कर्मचारी यांचीसुद्धा भरती करून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने तातडीने सुरू करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱयांना दिले. याप्रसंगी आमदार विलास पोतनीस, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, किधी समिती अध्यक्षा शितल म्हात्रे, आर /मध्य क आर/उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा संध्या दोशी, नगरसेविका रिद्धी खुरसुंगे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षिरसागर, माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, नगरसेवक हर्षद करकर, बाळकृष्ण ब्रीद, आर/ मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे उपस्थित होत्या.

अशी राहणार बेडची उपलब्धता
रुग्णालयात एकूण 150 बेड प्रस्तावित असून यामध्ये मेडिसिन 30, बालरोगशास्त्र 25, शस्त्रक्रिया 20, ओबीजीवाय 30, ऑर्थेपेडिक 20, ईएनटी – 5, नेत्ररोगशास्त्र – 5, आयसीयू 10, अपघात 5 असे बेड राहणार आहेत.

दहिसर चेकनाका कोविड सेंटर, भगवती रुग्णालयाची पाहणी
महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दहिसर चेकनाका येथील जम्बो कोकिड सेंटरमधील वॉर रूमची तसेच बोरिवली (पश्चिम) च्या हरिलाल भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकास कामाची पाहणी करून सेवा-सुविधांचा तसेच भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकास कामांचा संबंधित महापालिका अधिकाऱयांकडून आढावा घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या