
उपनगरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पोयसर जिमखान्याच्या सहकार्याने खासदार चषक कबड्डी स्पर्धा 5 ते 8 जानेवारीदरम्यान होत आहे. ही स्पर्धा एपंदर प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी पुरुष गट आणि महिला गट या तीन गटांत खेळविली जाणार असून बोरीवलीच्या पश्चिमेला असलेल्या प्रमोद महाजन क्रीडांगणात कबड्डीचा थरार अनुभवायला मिळेल.
प्रत्येक खेळाडूला प्रतिसामना 500 रु. मानधन
कबड्डीतील खेळाडूंनाही प्रो-कबड्डीप्रमाणे प्रत्येक सामन्याला मानधन मिळायला हवा आणि तो त्यांचा अधिकार असल्याचे सांगून सांघिक आणि वैयक्तिक रोख पुरस्कारांसह सामन्यात खेळणाऱया प्रत्येक खेळाडूला 500 रुपये मानधन देणार असल्याचे स्पर्धा आयोजकांनी जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच कबड्डीपटूंनी आणि संघटकांनी जोरदार स्वागत केले आणि हा निर्णय आता प्रत्येक आयोजकांनी घ्यायला हवा, असेही आवाहन आजी-माजी कबड्डीपटूंनी केले आहे.
या स्पर्धेच्या प्रथम श्रेणीत सह्याद्री क्रीडा मंडळ (गोरेगाव), श्री सिद्धी, नवमहाराष्ट्र मंडळ, ओम साई क्रीडा मंडळ, अभिनव क्रीडा मंडळ, नवजीवन क्रीडा मंडळ, प्रशांत, गोकुळवन आणि संघर्ष असे तगडे संघ खेळतील. ‘ब’ गटातही 12 नामांकित संघ खेळणार आहे. या दिमाखदार स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त जया शेट्टी आणि छाया शेट्टी या दांपत्याच्या हस्ते केला जाईल.

























































