बोरिवलीमध्ये बेकायदा पार्किंग, मोठ्या ट्रॉलीमुळे वाहतूककोंडी पालिकेकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष

बोरिवली पश्चिममधील फॅक्टरी लेन, एम.के. स्कूलजवळील संपूर्ण फुटपाथवर होणारे बेकायदा पार्पिंग आणि ट्रॉलीमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. शाळा सुटल्यावर तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे अपघात होण्याचाही धोका निर्माण झाला आहे. याबाबत पालिकेच्या ‘आर/मध्य’ वॉर्ड ऑफिसमध्ये तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

बोरिवली पश्चिम येथील फॅक्टरी लेनजवळ फुटपाथच्या ठिकाणी एक महाकाय ट्रॉली ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना चालणेही मुश्कील बनत आहे. शाळा सुरू होताना आणि सुटल्यावर वाहनांची गर्दी आणखी वाढते. यामुळे पालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या फुटपाथचा वापरही नागरिकांना करता येत नाही. याबाबत ट्रफिक पोलीस, ‘आर/सी’ वॉर्ड आणि थेट पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे तक्रारदार रहिवासी जयसुखलाल वाघानी यांनी सांगितले.

भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव

फॅक्टरी लेनवर मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा उपद्रवही वाढला आहे. या ठिकाणी काही जणांकडून बेकायदेशीरपणे खायला दिले जात असल्याने ही संख्या वाढतच आहे. या भागात रहदारी आणि शाळा असल्याने कुत्रे चावण्याचा धोका असतो. त्यामुळे या ठिकाणच्या श्वानांबाबत योग्य कार्यवाही करण्याची मागणीही वाघानी यांनी केली आहे.