नालासोपाऱ्यात नराधम मुलाने आई-वडिलांना स्क्रूड्रायव्हर, सुरीने भोसकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वसई

नराधम मुलाने झोपेत असलेल्या आई-वडिलांवर हातोड्याने प्रहार करत त्यांच्यावर स्क्रूड्रायव्हर आणि सुरीने भोसकून प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना पहाटे नालासोपाऱयात घडली. त्यांना जखमी अवस्थेत केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघेही मृत्यूशी झुंज देत आहेत. एखाद्या चित्रपटातील प्रसंगालाही लाजवेल अशी ही घटना असून हल्लेखोर मुलगा फरार झाला आहे. मात्र त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यपि समजू शकले नाही.

इम्पिरिअल टॉवरमधील सी विंग येथे फ्लॅट क्रमांक 202 मध्ये नरेंद्र पवार (53) हे आपली पत्नी नर्मदा (50) व मुलगा जन्मेश (20) यांच्यासोबत राहतात. जन्मेश हा कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला शिकत असून तो शेअर मार्केटमध्ये पार्टटाईम काम करतो. त्याचे वडील नरेंद्र हेदेखील शेअर मार्केटमध्येच काम करायचे. सोमवारी पहाटे त्याचे आई-वडिलांसोबत भांडण झाले. हे भांडण एवढे विकोपाला गेले की पहाटे पावणेचारच्या सुमारास जन्मेश याने घरातील मोठा स्क्रूड्रायव्हर आणि धारदार सुऱयाने झोपेत असलेल्या आई-वडिलांना भोसकले. हा क्रूरकर्मा एवढय़ावरच थांबला नाही तर त्याने हातोडीने दोघांवर प्रहार केले.

जखमी अवस्थेतही वडील नरेंद्र पवार यांनी बोळींज येथे राहणाऱया आपल्या मेहुण्याला मोबाईल करून आमच्यावर हल्ला झाला असून ताबडतोब घरी या, असे सांगितले. मेहुण्याने तातडीने धाव घेऊन दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद
आई-वडिलांवर हल्ला केल्यानंतर जन्मेशने पहाटे कपडे बदलले आणि डोक्यावर हेल्मेट तसेच हातात बॅग घेऊन तो पसार झाला. इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये तो कैद झाला असून या हल्ल्यामागे नेमके कारण काय? हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू नरवडे यांनी सांगितले.

शेअर बाजारातील व्यवहारावरून भांडणाचा संशय
जन्मेश पवार हा शेअर मार्केटमध्ये पार्टटाईम काम करत होता. त्याने काही पैसेही गुंतवल्याची शक्यता असून पैशाच्या देवाणघेवाणीवरून भांडण झाल्यानंतर त्याने थेट आपल्या आई-वडिलांवरच हल्ला केला असावा असा अंदाज आहे.