भीषण! मुख्यमंत्र्यांच्या निवासाजवळ पोलिसांच्या व्हॅनने शाळकरी मुलांना चिरडले; भावाचा जागीच मृत्यू, बहीण गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chhattisgarh tragedy police tow van kills school boy near cm residence in raipur

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. मुख्यमंत्री निवासाच्या काही अंतरावरच ट्रॅफिक पोलिसांच्या टोइंग व्हॅनने एका दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात शाळेत जाणाऱ्या एका मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची बहीण मृत्यूशी झुंज देत आहे. मुख्यमंत्री निवासासारख्या अतिसुरक्षित परिसरात घडलेल्या या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भावंडे आपल्या दुचाकीवरून (स्कूटर) खासगी शाळेत जात होती. यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांच्या टोइंग व्हॅनने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी मुलीला आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

व्हॅन सोडून चालक फरार

धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर टोइंग व्हॅनचा चालक वाहन घटनास्थळीच सोडून पळून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अपघातानंतर आरोपी चालक घाबरून पळाला आहे. आम्ही व्हॅन जप्त केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चालकाचा शोध घेतला जात आहे.’ याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तो भाग मुख्यमंत्री निवासाचा परिसर असल्याने तिथे नेहमी कडक सुरक्षा आणि वाहतूक पोलिसांचा पहारा असतो. अशा ठिकाणी पोलिसांच्याच वाहनाने शाळकरी मुलांना चिरडल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

chhattisgarh tragedy: police tow van kills school boy near cm residence in raipur

a heart-wrenching accident occurred near the chhattisgarh cm’s house in raipur where a police tow van hit school children. a boy died on the spot while his sister is critical.