आशिकी पडली महागात, चोर समजून प्रियकराला ग्रामस्थांनी दिला चोप

37

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशच्या खंदौली गावात एक विचित्र आणि हास्यास्पद घटना घडली आहे. चेहर्‍यावर रूमाल बांधून आपल्या प्रेयसीला पहायला आलेल्या एका प्रियकराला आणि त्याच्या मित्राला गावकर्‍यांनी चोर समजून बेदम मारल्याची घटना घडली आहे.

संध्याकाळच्या वेळीस दोन तरूण तोंडावर रूमाल बांधून मोटरसायकलवरून गावात संशयास्पदरित्या भटकत होते. त्यामुळे त्या दोघांना पाहून गावकर्‍यांना त्यांच्यावर संशय आला व गावकर्‌यांनी दोघांना हटकले आणि त्यांची चौकशी करण्यास सुरूवात केली. झालेल्या प्रकाराने दोघे तरुण बिथरले आणि घाबरून शेताच्या दिशेने पळू लागले. गावकर्‍यांनी त्या दोघांचा पाठलाग केला व दोघांना पकडून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. तेव्हा त्यातील एक तरूण जोरजोरात ओरडू लागला, ‘मी चोर नाही, मी माझ्या प्रेयसीला इथे पहायला आलो आहे. सहा महिन्यांपूर्वी तिचे लग्न या गावात झालं होतं.’ अशी माहिती त्याने दिली.  हे ऐकल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्याचे केस कापून त्याला विद्रूप केले.

जेव्हा प्रेयसीच्या घरात ही बातमी पोहोचली तेव्हा सासरच्यांनी तिच्याकडे जाब विचारला. तेव्हा तिने  विजेचा शॉक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्या घरच्यांनी तिला तत्काळ रूग्णालयात दाखल केले आणि पोलिसांनी त्या तरूणाला ताब्यात घेतले आहे. अद्याप या तरूणावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या