शिवसेना आमदारांच्या मागण्यांना प्रतिसाद न देता इतरांना नियमबाह्य मंजुरी, बाळा नर यांच्याकडून हक्कभंग दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना आमदारांच्या मागण्यांना प्रतिसाद न देता इतरांना नियमबाह्य मंजुरी देण्याचे सूत्र सत्ताधाऱयांनी अवलंबले आहे. त्याविरोधात आज शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील स्थानिक विकासकामे करण्याकरिता व नागरिकांच्या मागणीप्रमाणे आमदार निधीमधून नवीन कामे मी सुचवली होती. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी व प्राधिकरणाचे अधिकारी त्या कामांना कोणताही प्रतिसाद न देता माझी अनेक कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून माझ्यानंतर इतर प्रतिनिधींनी मागणी केलेल्या कामांना नियमबाह्य पद्धतीने प्रशासकीय मान्यता देऊन ती पूर्ण केली जात आहेत. मी मागणी किंवा प्रस्तावित केलेल्या कामांना लेखी पत्राने न कळवता तोंडी उत्तर देऊन माझी अनेक कामे मागील वर्षभरात प्रलंबित ठेवण्यात आली आहेत, असे आमदार नर यांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिका, म्हाडाच्या संबंधित अधिकाऱयांकडून लोकप्रतिनिधी म्हणून मी करीत असलेल्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असून लोकप्रतिनिधीच्या अधिकाराचा त्यांच्याकडून भंग करण्यात येत आहे, असे नर यांनी म्हटले आहे.
आमदार नर यांनी के/उत्तर (पूर्वीचे के/पूर्व) कार्यकारी अभियंता घुमाळे, सहाय्यक अभियंता विशाद कुलकर्णी आणि म्हाडा (मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ) विभागाचे कार्यकारी अभियंता अभय रामटेके हे या सर्व प्रकरणी जबाबदार आहेत, असे आमदार नर यांनी म्हटले आहे.