Breaking – हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला पोलिसावर अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासह जवळाबाजार व वसमत येथे लग्नाचे आमीष दाखवत पोलीस कर्मचारी मुनीर इब्राहिम मुन्नीवाले याने शारीरिक अत्याचार करुन इच्छेविरुध्द गर्भपात घडवुन आणल्याची तक्रार एका दलित महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिली आहे. या तक्रारीवरुन वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये मुनीर मुन्नीवाले याच्याविरुध्द शारीरिक अत्याचारासह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अधिनियमातील कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातच पोलीस कर्मचाऱ्याने महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या अब्रुचे धिंडवडे उडाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी मुनीर ईब्राहिम मुन्नीवाले (बक्कल नंबर 253) हा सध्या औंढा नागनाथ पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. मुनीर मुन्नीवाले याने एका पोलीस कर्मचारी महिलेला लग्नाचे आमीष दाखवत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासह औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार, वसमत शहरातील पोलीस वसाहत या ठिकाणी 15 ऑक्टोबर 2015 ते 10 ऑगस्ट 2019 पर्यंत वेळोवेळी मुन्नीवाले याने शारीरिक अत्याचार केल्याचे या महिला पोलिसाने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही महिला पोलीस कर्मचाऱ्याची लग्न करण्याची मागणी करुन देखील धुडकावण्यात आले. यासोबतच इच्छेविरुध्द गर्भपात केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लिल शिवीगाळ केल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

लग्नाची मागणी पूर्ण न करता फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलीस कर्मचारी मुनीर मुन्नीवाले याच्याविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यावर पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.