सलग 5 चेंडूवर 5 विकेट्स; 254 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच झाला असा चमत्कार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. क्रीडाप्रेमींच्या नजरा याकडे लागलेल्या असतानाच न्यूझीलंडच्या एका गोलंदाजाने अशी कामगिरी करून दाखवली आहे ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. तब्बल 254 वर्षांचा देशांतर्गत क्रिकेटचा इतिहास मोडीत काढत न्यूझीलंडच्या ब्रेट रँडेलने याने सलग 5 चेंडूत 5 विकेट्स घेण्याचा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे.

न्यूझीलंडमधील मानाच्या ‘प्लंकेट शिल्ड’ स्पर्धेत सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स आणि नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स यांच्यात सामना रंगला होता. नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सने साधव सुरुवात केली होती. त्यांच्या बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. त्यानंतर ब्रेट रँडेल गोलंदाजीला आला आणि पुढच्या काही मिनिटांत त्याने फलंदाजांच्या बत्त्या गुल करत नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सची अवस्था 5 बाद 9 धावा अशी केली.

ऐतिसासिक स्पेल

  • पहिली विकेट – रँडेलने आपल्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सलामीवीर हेन्री कूपरला बाद केले.
  • दुसरी विकेट- पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने जीत रावलला माघारी धाडले.
  • तिसरी विकेट (हॅट्ट्रिक)- जो कार्टरला झेलबाद करत त्याने आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली.
  • चौथी विकेट- पुढच्याच चेंडूवर रॉबर्ट ओ’डोनेल स्लिपमध्ये झेलबाद झाला.
  • पाचवी विकेट (विश्वविक्रम)- पाचव्या चेंडूवर ख्रिश्चन क्लार्कला क्लीन बोल्ड करत रँडेलने सलग 5 चेंडूत 5 बळी घेण्याचा कारनामा केला.

दरम्यान, एवढ्यावरच न थांबता रँडेलने पुढे 8 चेंडूंत 6 बळी घेण्याचाही विक्रम केला. या लढतीत त्याने अवघ्या 11 षटकांत 25 धावा देत 7 फलंदाजांना बाद केले. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्सचा डाव अवघ्या 82 धावांत आटोपला.

मी स्वत:ला चिमटा काढून पाहिलं

हा माझ्यासाठी स्वप्नवत क्षण होता. हे खरंच घडतंय का, हे पाहण्यासाठी मी स्वतःला चिमटा काढून पाहत होतो, अशी प्रतिक्रिया रँडेलने सामन्यानंतर दिली.