
गतवर्षीप्रमाणे यंदाही मंडपांसाठी खड्डय़ांवर आकारला जाणारा 2 हजार रुपयांचा दंड माफ करावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. खड्डय़ांसदर्भातील 2 हजार रुपयांचा दंड माफ होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समन्वय समितीच्या वतीने सांगण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सवनिमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री आढावा घेताना बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, गृहराज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह अन्य अधिकारी आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पीओपी मूर्तीसंदर्भात कायमस्वरूपी दिलासा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. अग्निशमन दलाचे बंब असतात ते लालबागचा राजा येथे उभे असतात. यासाठी दिवसाला सवा लाख रुपये शुल्क आकारले जाते ते माफ करण्यात यावे. गेली 30 वर्षे अनंत चतुर्दशीला मिळणारी सुट्टी पूर्ववत करावी तसेच कर आकारणी करताना गणेशोत्सव मंडळांचे ऑफिसनुसार कमर्शिअल असेसमेंट केले जाते यात सूट मिळावी, अशा मागण्या समन्वय समितीने केल्याचे नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
ध्वनिक्षेपक परवानगी दिवस वाढणार
गणेशोत्सवादरम्यान ध्वनिक्षेपकांना दिलेल्या परवानगीचे दिवस वाढविण्यासाठी न्यायालयाच्या अधिन राहून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.