…तर हिंदुस्थानावर अणुबॉम्ब फेकेन, ब्रिटीश यूट्युबरला मीम पडला भारी

ब्रिटीश युट्युबर माइल्स राउटलेज याला हिंदुस्थानशी पंगा घेणे चांगलेच महागात पडले आहे. गमतीत हिंदुस्थानावर अणुबॉम्ब फेकण्याबाबत तो बोलला आणि त्यानंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला आहे. शिवाय त्याने हिंदुस्थानच्या नागरिकांबाबत वर्णद्वेषी टिप्पणी केल्यानंतर सोशल मीडियातून त्याच्यावर जोरदार टीका झाली. वास्तविक या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात त्याने X वर अपलोड केलेल्या मीम व्हिडिओपासून झाली.

व्हिडीओमध्ये तो लंडनचा पंतप्रधान झाल्यानंतर हिंदुस्थानावर अणुबॉम्बने हल्ला करेन, असे विधान केले होते. त्याच्या काही वेळानंतर युट्युबरने हिंदुस्थानाबाबत वर्णद्वेषी टिप्पणीही केली होती. त्यानंतर तो चांगलाच ट्रोल झाला होता. सुरुवातीला त्याने मीमच्या माध्यमातून व्हिडीओ गंमत म्हणून शेअर केला जो नंतर वादग्रस्त बनला.

माइल्स राउटलेज याने आपल्या सोशल मीडीया अकाऊंट एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले की, मी इंग्लंडचा पंतप्रधान बनलो तर ब्रिटीश हिताच्या आणि अन्य प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या कोणत्याही विदेशी शक्तीला अणुबॉम्बने उडविण्याची धमकी देईन. मी मोठ्या घटनांबाबत बोलत नाही, लहानात लहान नियमांच्या उल्लंघनावरही देशांवर हल्ला करण्याची इच्छा ठेवतो आणि बॉम्ब हल्ला करण्याची इच्छा ठेवतो. काही वेळाने त्याने पुन्हा एक पोस्ट केली आणि लिहीले, मी हिंदुस्थानावरही अणुबॉम्ब फेकू शकतो.

ब्रिटीश युट्युबरची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. सोशल मीडिया युजर्सनी या पोस्टवर आक्षेप घेतला आणि त्याला रिपोस्ट करत उत्तर देत आहेत. युजर्स त्या युट्युबर विरोधात ब्रिटीश सरकारकडे कारवाईची मागणी करत आहेत.