विनेश फोगाट कुस्तीला पदक मिळवून देण्यात दुर्दैवी ठरली, पण अमन सेहरावतने 57 किलो वजनी गटात पोर्तोरिकाच्या डार्लिन तुई क्रुझचा 13-5 असा धुव्वा उडवत कांस्य पदकाची कमाई केली. त्याच्या या कामगिरीमुळे हिंदुस्थानने कुस्तीतील आपले पदकांचे खाते उघडले तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांचा षटकार ठोकला. हिंदुस्थानने चौदाव्या दिवसअखेर 5 कांस्य आणि एक रौप्य पदकासह सहावे पदक जिंकत 2012 च्या लंडन ऑलिम्पिकच्या पदकांची बरोबरीही साधली.
2008 सालापासून ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कुस्तीने आजच्या पदकासह सहा कांस्य आणि दोन रौप्य जिंकले आहेत. यावेळी कुस्तीला दोन-तीन पदकांची अपेक्षा होती. त्यातच विनेश दुर्दैवीरीत्या वजनवाढीमुळे अपात्र ठरल्यामुळे हिंदुस्थानचे एक पदक हुकले. गुरुवारी अमनला उपांत्य फेरीत धक्का बसल्यामुळे आज त्याला कांस्य पदकाची लढत खेळावी लागली आणि त्याने अपेक्षेप्रमाणे जोरदार खेळ करत प्रतिस्पर्ध्याला लोळवत पदक जिंकले.
मनूसह श्रीजेशलाही ध्वजवाहकाचा मान
ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात हिंदुस्थानला नेमबाजीमध्ये कांस्यपदक मिळवून देणारी नेमबाज मनू भाकरसह हिंदुस्थानच्या हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेशसुद्धा ध्वजवाहक म्हणून हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. हिंदुस्थानी ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी याबाबत घोषणा केली आहे.
विनेशबाबत निर्णय ऑलिम्पिक संपण्यापूर्वी
विनेश फोगटला अतिरिक्त वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकच्या 50 किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात खेळण्यापूर्वीच अपात्र ठरवले होते. याप्रकरणी विनेशने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादामध्ये धाव घेत तिला संयुक्त रौप्यपदक मिळावं अशी मागणी असून तिच्या याचिकेवर दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून ऑलिम्पिक संपण्यापूर्वी निर्णय घेतला जाणार असल्याचे लवादाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.