‘बीएसएनएल’ गाशा गुंडाळणार, जून महिन्याचा पगार द्यायलाही पैसे नाहीत

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

गेले अनेक महिने ‘बीएसएनएल’ या सरकारी टेलिकॉम कंपनीच्या तिजोरीत खडखडाट असून ग्राहकांना सेवा देण्यास आता पूर्णपणे असमर्थ असल्याचे सांगत कंपनीने केंद्र सरकारकडे मदतीची याचना केली आहे. कंपनीची हालत इतकी खराब आहे की जून महिन्याचा कर्मचाऱ्यांचा 850 कोटींचा पगारही देणे शक्य होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीवर सध्या 13 हजार कोटींचा बोजा आहे.

बीएसएनएलचे कॉर्पोरेट बजेट ऍण्ड बँकिंग डिव्हिजनचे वरिष्ठ महाव्यवस्थापक पूरन चंद्र यांनी टेलिकॉम मंत्रालयाच्या सहसचिवांना पत्र लिहून याची कल्पना दिली आहे. पत्रात म्हटले आहे की,  ‘दर महिन्याला कंपनीला मिळणारा महसूल आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे कंपनीला आता ग्राहकाला सेवा देणे शक्य होणार नाही. आता परिस्थिती एवढी बिकट झाली आहे की दुसऱ्या एखाद्या भागीदाराला कंपनीत सहभागी केल्याशिवाय कंपनी चालवणे जवळजवळ अशक्यच आहे.’

सर्वाधिक तोटय़ातील सरकारी कंपनी

विविध सरकारी कंपन्यांपैकी बीएसएनएल ही सर्वाधिक तोटय़ातील कंपनी आहे. डिसेंबर 2018 मध्ये बीएसएनएलला 90 हजार कोटींचे नुकसान झाले होते. यातून बाहेर पडण्यासाठी बीएसएनएलने तातडीने कार्यवाही करून कंपनीला वाचवण्यासाठी सरकारला पत्र लिहिले होते, मात्र त्याबाबत पुढे काही झाले नाही.

कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मोठा बोजा

कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार आणि अन्य सुविधांमुळे कंपनीवर मोठा बोजा पडत आहे. 2018मध्ये कंपनीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा पीएफ आणि अन्य सुविधांवर 66 टक्के खर्च झाला. 2006मध्ये हा खर्च केवळ 21 टक्के होता.

पंतप्रधानांनी आढावा घेतला,  पण उपाययोजना नाहीच

काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिकदृष्टय़ा ढबघाईला आलेल्या ‘बीएसएनएल’चा आढावा घेतला होता. बैठकीत कंपनीच्या अध्यक्षांनीच याची माहिती मोदींना प्रेंजेंटेशनसह दिली होती, मात्र या आढावा बैठकीनंतरही या सरकारी कंपनीला वाचवण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. कंपनीमध्ये 1 लाख 7 हजार कर्मचारी असून त्यांच्यासमोर रोजगाराचे मोठे संकट उभे राहणार आहे.

पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा

कंपनीच्या इंजिनीअर्स आणि लेखापरीक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संघाने गेल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि कंपनीची गाडी पुन्हा रुळांवर आणावी अशी विनंती केली होती. ‘बीएसएनएल’वर कोणतेही कर्ज नाही. कंपनीच्या बाजारातील हिस्सेदारीतही वाढ होत आहे. अशा परिस्थितीत कंपनीला पुन्हा उभारी देणे शक्य आहे. कंपनीतील कामचोरांवर कारवाई केली जावी अशी विनंतीही त्यांनी केली होती.

  • कंपनीने 2008-9मध्ये 575 कोटींचा शेवटचा नफा कमावला होता.
  • कंपनीकडे 65 हजार कोटींची जमीन आहे.
  • 8 लाख किलोमीटरचे ऑप्टिकल फायबर आहेत.
  • कंपनीकडे 65 हजार टॉवर असून त्याची किंमत 6,500 कोटी इतकी आहे.